"अबे, गाडीखाली अडकला बघ," Live Streaming करत असतानाच कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू; थरारक VIDEO

Viral Video: रस्त्याच्या मधोमध बसलेल्या एका व्यक्तीला कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 19, 2023, 02:03 PM IST
"अबे, गाडीखाली अडकला बघ," Live Streaming करत असतानाच कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यू; थरारक VIDEO title=

Viral Video: सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक कार रस्त्यावर बसलेल्या व्यक्तीला चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री झालेली ही धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुसऱ्या कारमध्ये बसलेली व्यक्ती सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रिमिंग करत असतानाच ही दुर्घटना घडली. दरम्यान, चालकाला या अपघाताची काही कल्पनाच नव्हती. रस्त्यावरील लोकांनी त्याला सांगितलं असता त्याने गाडी थांबवली. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाजियाबादमध्ये (Ghaziabad) ही घटना घडली आहे. 

व्हिडीओत एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध बसल्याचं दिसत आहे. यावेळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ दिसत आहे. दरम्यान, पीडित व्यक्ती रस्त्यावर बसलेली असतानाच मागून आलेली सफेद रंगाची कार त्याला धडक देते. दरम्यान, रस्त्याच्या मधोमध एक माणूस बसला होता याची चालकाला काहीच कल्पना नव्हती. यामुळे धडक दिल्यानंतरही तो कार चालवत होता. यावेळी ती व्यक्ती त्याच्या कारखाली अडकली होती. पीडित व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 

दरम्यान, जी व्यक्ती व्हिडीओ शूट करत होती ती अपघात पाहिल्यानंतर ओरडताना ऐकू येत आहे. "अबे खाली अडकला बघ. माणूस अडकलाय खाली. गाडी थांबव. त्या गाडीचा नंबर घे लवकर," असं तो बोलत असल्याचं ऐकू येत आहे. गाजियाबादच्या हापूर रोडवर हा सगळा प्रकार घडला. 

व्हिडीओत काही पादचारीदेखील दिसत आहेत. ते या कारचा नंबर लिहून घेतात. दरम्यान, कारचा चालक खाली उतरताना दिसत असून त्यानंतर व्हिडीओ संपत आहे. व्हिडीओत दिसत आहे, त्यानुसार, कारवर एका राजकीय पक्षाचा झेंडा आणि स्टिकर दिसत आहे. 'विधायक प्रतिनिधी' (विधानसभा सदस्याचा प्रतिनिधी) असं स्टिकर पुढील बाजूला लावण्यात आलं होतं. 

पोलिसांनी कारचालक आणि वाहनाला तपासासाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पीडित व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध बसली असून कार त्याला धडक देताना दिसत आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कवीनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कारचालकाला ताब्यात घेण्यात आलं असून, वाहनही जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल". दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.