मुंबई : काही वर्षांपूर्वी 'अथ श्री महाभारत कथा....' असे शब्द काही पडले की घरातील सर्व मंडळी एकाच जागी एकत्र येत असत. ही जागा होती टीव्हीसमोरची. महाभारत या महाकाव्याला मालिकेचं स्वरुप देत काही वर्षांपूर्वी कलेचा एक अदभूत नजराणा प्रेक्षकांच्या भेटीला आला. कृष्ण उपदेश, शकुनी मामांची चाल, कौरवांची कटकारस्थानं आणि पांडवांचा वनवास असं साहंकाही या मालिकेतून पाहायला मिळालं. कुरुक्षेत्रावर घडलेलं हे महाभारत आजही तितकंच लोकप्रिय आहे. सोबतच लोकप्रिय आहे या मालिकेचं शीर्षकगीत.
'मै काल हूँ....' असं म्हणत सार सांगणारा एक आवाजही याच मालिकेचा भाग. एकाएकी महाभारताच्या शीर्षकाची चर्चा होण्यास कारण ठरत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ. जिथं धर्माच्या चौकटी ओलांडत एक वयोवृद्ध मुस्लिम चाचा महाभारताचं शीर्षकगीत गाताना दिसत आहेत.
डॉ. कुरेशी यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. भारताचे माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी हा व्हिडीओ शेअर करत 'Beating the stereotypes!' , चौकटी मोडतानाचा संदर्भ देणारं कॅप्शन त्याला दिलं. पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाला.
I agree. Well done Maulana Saheb. Impressed. https://t.co/D5oUEBApap
— digvijaya singh (@digvijaya_28) September 20, 2021
'कथा है पुरुषार्थ की, स्वार्थ की, परमार्थ की...' असं म्हणताना चाचांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्यांचे हातवारे हे गीत आणखी प्रभावी करुन जात आहेत. त्यांचे उच्चार आणि आवाजात असणारा कणखरपणा अंगावर काटाच आणून जात आहे. धर्माच्या नावावर अनेक ठिकाणी निराशाजनक वातावरण पाहायला मिळत असताना इथं या चाचांनी गायलेलं हे गीत पाहून सारेच नतमस्तक होत आहेत.