नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यातील कशांग नालाजवळ डोंगराचा कडा पाहता पाहता कोसळला... आणि हे दृश्यं पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला... उल्लेखनीय म्हणजे, हे दृश्यं कॅमेऱ्यातही कैद झालंय. डोंगराचा कडा कोसळल्यानं नॅशनल हायवे ५ वर ट्राफिक जाम झालं. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. एकच रस्ता असल्यानं लोकांना रस्यावर कोसळलेली दरड हटवल्याशिवाय पुढे निघता येणार नाही. त्यामुळे लोकांना रस्ता पूर्ववत होण्याची वाट पाहण्याची वाट पाहावी लागणार आहे.
याच घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत डोळ्यांदेखतच कडा धाड्धाड् कोसळताना दिसत आहे. सुरुवातीला डोंगररांगांतून आवाज येत असल्यानं आणि काही हालचाल जाणवल्यानं रस्त्यावरचे प्रवासी जागेवरच स्तब्ध उभे असलेले दिसतात. काही लोक आपला जीव वाचवण्यासाठी गोंधळून इकडे-तिकडे धावताना दिसतात.
#WATCH Himachal Pradesh: Traffic on National Highway 5 blocked after a portion of the mountain fell on the road near Kashang Nala in Kinnaur, today. pic.twitter.com/BCzylTewGT
— ANI (@ANI) June 25, 2019
उल्लेखनीय म्हणजे, कशांग नाल्याजवळ अशा घटना अनेकदा घडल्यात. दोन दिवसांपूर्वी एक डोंगरकडा कोसळल्यानं दोन बाईकस्वारांचा मृत्यू झाला होता. हे दोघेही चंदीगडचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, बाईक राईडसाठी निघालेले हे दोघे कशांग नालाजवळ पोहचले... आणि प्रवासातच काही ध्यानीमनी नसताना त्यांच्या अंगावर वरतून डोंगरकडा कोसळला. त्यानंतर या परिसरात भीती पसरलीय.