indiavschina : सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नव्हे; कमल हसन यांचा हल्लाबोल

अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडत ते म्हणाले... 

Updated: Jun 22, 2020, 10:43 AM IST
indiavschina : सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह नव्हे; कमल हसन यांचा हल्लाबोल  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : India China violent face-off भारत- चीनदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षाबाबत भावनिकरित्या जनतेची दिशाभूल करणं थांबवा या शब्दांत ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. कलाविश्वाकडून राजकीय वर्तुळाकडे वळलेल्या हसन यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

जवळपास आठवडाभरापूर्वी ल़डाखच्या GalwanValley गलवान खोऱ्यामध्ये indiavschina भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या लष्करामध्ये हिंसक झडप झाली होती. यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यातील जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. या संघर्षाची माहिती समोर आल्यानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरिय बैठका, चर्चांची सत्र सुरु झाली. आरोप - प्रत्यारोपांची किनारही त्याला होती. याच मुद्द्यावर हसन यांनी सरकारची भूमिका अधोरेखित करत त्याबाबत आपलं मत मांडलं. 

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान मोदींच्या भूमिकेला त्यांनी धारेवर धरलं. 'आपल्या हद्दीत कोणीही घुसखोरी केली नव्हती आणि आपल्या लष्कराच्या चौकीवर कोणाचाही ताबा नव्हता', असं मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर निशाणा साधत अशा प्रकारची भावनिक वक्तव्य करत जनतेची दिशाभूल करणं थांबवा अशीच एक प्रामाणिक विनंती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना करतो, अशी स्पष्ट भूमिका हसन यांनी मांडली. 

'(सरकारच्या भूमिकेवर किंवा कोणत्याही मुद्द्यावर) प्रश्न उपस्थित करणं म्हणजे देशद्रोह नाही. किंबहुना प्रश्न उपस्थित करणं हा तर लोकशाहीचा पाया आहे आणि आम्ही प्रश्न विचारणं सुरुच ठेवणार जोपर्यंत सत्य आम्हाला कळत नाही', या शब्दांत सर्वपक्षीय बैठकीतील पंतप्रधान, लष्करी अधिकारी आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या विरोधाभासी भूमिकांवर हसन यांनी हल्लाबोल चढवला. फक्त हसनच नव्हे, तर विरोधी पक्षांनीही सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरुन घेरल्याचं पाहायला मिळालं होतं. 

 

अशा संवेदनशील प्रसंगी सरकरानं देशातील जनतेला विश्वासात घेत त्यांच्यापुढे सत्यपरिस्थिती ठेवावी, त्यांना प्रसंगाची माहिती द्यावी असा आग्रही सुर हसन यांनी आळवला. 'काही माहितीची पडताळणी होईलच. पण, लष्करावर अविश्वास दाखवू नका, देशद्रोही भूमिका घेऊ नका असं म्हणण्यापेक्षा तुम्ही या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणू शकता. किमान यामध्ये पारदर्शकता बाळगा', असं ते म्हणाले. सरकार काही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बांधिल असल्याचं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.