vande bharat metro train : भारतीय रेल्वेनं काळानुरुप अधिकाधिक क्षेत्र आणि विभागांमध्ये प्रगती केली असून, याच रेल्वेचा आणखी एक कमाल टप्पा लवकरच देशवासियांच्या सेवेत दाखल होणार आहे. वंदे भारत या रेल्वे उपक्रमाला प्रवाशांनी कमाल प्रतिसाद दिल्यानंतर आता देशातील पहिलीवहिली वंदे भारत मेट्रो ट्रेनही लवकरच सेवेत येणार आहे. सध्या या रेल्वेची ट्रायल रन सुरू झाली असून, ही प्रक्रिया येत्या काही दिवसांतच पूर्ण होणार आहे.
ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी ही वंदे भारत रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सामान्यांमध्येही या वंदे भारत मेट्रो ट्रेनसंदर्भात कमालीचं कुतूहल असून, सध्या या प्रवासाचं तिकीट नेमकं किती रुपयांना असेल हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रेल्वेशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार वंदे भारत मेट्रो ट्रेनचे तिकीटदर एसी चेअरकारहून कमी असल्याची शक्यता असून, आता शहरानुसार हे दर कमी-जास्त असू शकतात. सध्याच्या घडीला तिकीट दरांसंदर्भातील अधिकृत माहिती समोर आली नसून, यंत्रणांकडून मेट्रो आणि आरआरटीएस अशा दोन्ही तिकीटदरांचा आढावा घेतला जात आहे. प्राथमिक स्तरावर या रेल्वेचे तिकीट दर कमीत कमी ठेवण्यात येणार असून, त्यामार्फत अधिकाधिक प्रवाशांना वंदे भारत मेट्रोनं प्रवासाची सुविधा पुरवली जाणार आहे.
देशभरातील जवळपास 124 शहरं या रेल्वेशी जोडण्यात येणार असून, सध्या काही मार्ग निश्चितही करण्यात आले आहेत. यामध्ये आग्रा- दिल्ली, तिरुपती- चेन्नई, दिल्ली - मुरादाबाद, भुवनेश्वर - बालासोर, दिल्ली- रेवाडी, आग्रा- मथुरा, लखनऊ- कानपूर या मार्गांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.
वंदे भारत ट्रेनला देशाच्या विविध राज्यांतून विविध मार्गांवरील प्रवाशांनी पसंती देत मेट्रोसाठी हिरवा कंदिल दिल्यामुळं आता प्रत्यक्षात मेट्रोला नेमकी कितपत पसंती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.