बोगद्यात अडकलेला मुलगा बाहेर येण्याआधीच बापाने सोडला प्राण; 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली पण...

Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंडमध्ये बोगद्यात अडकलेल्या एका मजुराच्या वडिलांचे रेक्सु ऑपरेशन संपण्याआधीच निधन झालं आहे. मजुराला बाहेर आल्यानंतर ही माहिती मिळाली आणि त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.

आकाश नेटके | Updated: Nov 29, 2023, 01:29 PM IST
बोगद्यात अडकलेला मुलगा बाहेर येण्याआधीच बापाने सोडला प्राण; 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली पण... title=
(फोटो सौजन्य - PTI)

Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्यात (silkyara tunnel) 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांना अखेर मंगळवारी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. 'रॅट होल मायनिंग' तंत्राचा वापर करुन 41 मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंह यांनी सुटलेल्या कामगारांची भेट घेतली. मात्र बोगद्यातून बाहेर आलेल्या एका मजुरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेले 17 दिवस बोगद्यात अडकलेल्या एका मजुरांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.

सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मुजरांची त्यांचे कुटुंबिय गेल्या 17 दिवसांपासून वाट पाहत होते. बोगद्यातून बाहेर पडल्यावर मजुराच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पण या 41 मजुरांमध्ये एक मजूर असा होता की त्याच्या चेहऱ्यावरचे हसू काही मिनिटांतच नाहीसे झाले. कारण त्याच्या डोक्यावरुन वडिलांची सावली नाहीशी झाली होती. भक्तू मुर्मू असे या दुर्दैवी मजुराचे नाव असून तो झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्ह्यातील रहिवासी आहे.

झारखंडच्या बंकीशीलमधील 29 वर्षीय भक्तू मुर्मू हा देखील त्या 41 मजुरांसह बोगद्यात अडकला होता. मात्र भक्तू बोगद्यात अडकल्याची माहिती त्याचे बसेत उर्फ ​​बारसा मुर्मू यांना कळली. त्यांना या घटनेचा इतका जबर धक्का बसला की त्यांची प्रकृती खालावली. अखेर मुलगा बाहेर येण्याआधीच बसेत मुर्मू यांचा मृत्यू झाला. मुलगा सुखरूप बाहेर येण्याची वाट पाहत असलेले 70 वर्षीय बसेत मुर्मू यांचे मंगळवारी निधन झाले. भक्तू मुर्मू 17 दिवसांनी बोगद्यातून बाहेर आला आणि वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा त्यालाही अश्रू अनावर झाले होते.

बरसा मुर्मू यांच्या जावयाने सांगितले की, भक्तू मुर्मू बोगद्यात अडकल्याची माहिती मिळाल्यापासून ते अनेक दिवस काळजीत होते. भक्तू मुर्मूचा मोठा भाऊ रामराय मुर्मूही कामासाठी चेन्नईला गेला आहे. तर दुसरा भाऊ मंगल मुर्मू हा दुसऱ्या गावात मजूर म्हणून काम करायचा. ही घटना कळली त्यावेळी घरात फक्त बरसा मुर्मू यांची पत्नी, मुलगी आणि जावई उपस्थित होते. भक्तू आत अडकल्याचे कळताच बरसा यांची तब्येत बिघडली. दररोज निराशाजनक बातमी मिळाल्याने वडील बरसा मुर्मू यांना धक्का बसत होता. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला होता. बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे 60 मीटरचा भाग खचल्याने 41 कामगार अडकले होते. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकले होते. अखेर मंगळवारी 17 दिवसांनी सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आलं आहे.