संपत्तीसाठी मुलींचं भांडणं, 9 तास आईचा मृतदेह चितेवर.. स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा

आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये संपत्तीवरुन जोरदार भांडण झालं. या सर्व भांडणात स्मशानभूमीत आईचा मृतदेह तब्बल नऊ तास चितेवर तसाच पडून होता. प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत चितेला अग्नी देणार नाही अशी भूमिका मुलींनी घेतली. ही घटना व्हायरल झाली असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. 

राजीव कासले | Updated: Jan 15, 2024, 05:00 PM IST
संपत्तीसाठी मुलींचं भांडणं, 9 तास आईचा मृतदेह चितेवर.. स्मशानभूमीत हाय व्होल्टेज ड्रामा title=

Trending News : संपत्तीसाठी कुटुंबातील भांडणं ही काही नवी गोष्ट नाही. अनेक घटनांमध्ये तर रक्तातील नातीच जिवावर उठल्याच्या घटना घडल्या आहेत. भावाने भावचा, पत्नीने पतीचा काही घटनांमध्ये तर मुलांनी जन्मदात्या आई-वडिलांनाच संपवल्याची अनेक उदाहरण  आहेत. पण उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एक वेगळीच घटना घडली आहे. आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जोरदार भांडण झालं. स्मशानभूमीत आईचा मृतदेह चितेवर तसाच ठेऊन मुली एकमेकांना भिडल्या. जोपर्यंत प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत आईच्या  मृतदेहाला अग्नी देणार नाही अशी भूमिकाच मुलींनी घेतली. यात तबब्ल 8 ते 9 तास गेले. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) झाली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

काय आहे नेमकी घटना?
माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना उत्तरप्रदेशमधल्या मथुरा (Mathura) इथली आहे. 85 वर्षांच्या पुन्हा नावाच्या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या संपत्तीवरुन तीन मुलींमध्ये जमिनीच्या वाटपावरुन वाद सुरु झाला. हा वाद इतका टोकाला गेला की तिघींपैकी एकही मुलगी माघार घेण्यास तयार नव्हती. त्यामुळे मृतदेहावर अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत. 

अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत आलेले पंडितही अंतिम संस्काराचे विधी न करतातच निघून गेले. स्मशानभूमीत अनेक तास मुलींचा हायव्होल्टेज ड्रामी सुरुच होता. यामुळे अंतिमसंस्कारासाठी आलेली लोकं आणि नातेवाईकही हैराण झाली. शेवटी स्टॅम्पपेपरवर जमिनीची लिखित विभागणी झाल्यानंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. 

तीन मुलींमध्ये भांडण
मृत पुष्पा यांना तीन मुली आहेत. मिथिला, सुनीता आणि शशि अशी या मुलींची नावं असून तिघींचीही लग्न झाली आहेत. मोठी मुलगी मिथिला हिने आईची फसवणूक करत दोन गुंठे जमीन विकली. याची माहिती सुनीता आणि शशी यांना मिळाली. यावरुन दोघींनी स्मशानभूमीतच मिथिलाशी वाद घालायला सुरुवात केली. विकलेल्या जमिनीत पैशाचा हिस्सा आम्हाला हवा अशी मागणी दोघींनी केली. पण याला मिथिलाने विरोध केला. यावरुन वाद बराच लांबला. 

शेवटी याची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तिनही बहिणींमध्ये लिखित करार झाला. आईच्या नावे असलेली उर्वरित जमीन ही सुनिता आणि शशीच्या नवावर केली जावी असं या करारत नमुद करण्यात आलं. तिघींनाही हे मान्य झाल्यानंतर आईच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले. या सर्वात आठ ते नऊ तास वाया गेले.