Osama Bin Laden: 'आदरणीय ओसामा बिन लादेन, जगातील सर्वोत्तम अभियंता'

सरकारी कर्मचाऱ्याने घरावर ओसामा बिन लादेनचा फोटो चिटकवल्याने खळबळ  

Updated: Jun 1, 2022, 10:29 PM IST
Osama Bin Laden: 'आदरणीय ओसामा बिन लादेन, जगातील सर्वोत्तम अभियंता' title=

SDO glorifying the terrorist Osama Bin Laden: दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला (Osama Bin Laden) दोन दशकांपूर्वी यूएस सील कमांडोंनी ठार मारलं. पण उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) फर्रुखाबादमध्ये एक सरकारी कर्मचारी अजूनही दहशतवादी लादेनचा चाहता आहे. त्याने ओसामा बिन लादेनचा फोटो त्याच्या सरकारी घरात लावला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 

इतकंच नाही तर लादेनच्या धोरणांचा मोठा चाहता असल्याचं या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. लादेनच्या फोटोखाली या अधिकाऱ्याने 'आदरणीय ओसामा बिन लादेन, जगातील सर्वोत्तम अभियंता' असं लिहिलं आहे.

लादेनला म्हटलं सर्वोत्तम अभियंता
हे अनोखे प्रकरण फारुखाबादच्या नवाबगंज भागातील आहे. इथल्या विद्यूत विभागात काम करणारे एसडीओ (SDO) रवींद्र प्रकाश गौतम यांनी आपल्या सरकारी घरात ओसामा बिन लादेनचा फोटो लावून त्याला जगातील सर्वोत्तम अभियंता म्हटलं आहे. ज्याला संपूर्ण जगाने दहशतवादी मानलं त्या लादेनला सर्वोत्तम अभियंता म्हटल्याने आता वाद उभा राहिला आहे. यानंतर एसडीओला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे.

एसडीओच्या घरातील लादेनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विद्युत विभागातील अधीक्षक अभियंता यांनी या प्रकरणाचा अहवाल सरकारला पाठवला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही रवींद्र गौतम यांना मात्र आपल्या कृतीचा अजिबात पश्चाताप नाही. लादेनचं कौतुक करतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याप्रकरणी आता जिल्हा प्रशासनानेही कारवाईचे संकेत दिले आहेत.

प्रकरणाची होणार चौकशी
हा वाद पेटताच रवींद्र प्रकाश भूमिगत झाले असून आता तो फोटोही काढून टाकण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाच्या तपास सुरु करण्यात आला आहे.