नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील एका भाजप नेत्यावर किरकोळ वादातून एका ज्येष्ठ व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. केवळ व्यापारीच नव्हे तर, त्याच्या मुलालाही या नेत्याने मारहाण केल्याचे वृत्त आहे. या मारहाणीत व्यापारी आणि त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित व्यापारी पोलिसांकडे तक्रारीसाठी पोहोचला मात्र, त्याच्यावर दबाव टाकून तक्रार करण्यापासून त्याला रोखण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, संबंधीत नेत्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
ही घटना अलीगड जिल्ह्यात घडली. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तानुसार, शहराध्यक्ष असलेले भाजप नेते संजय गोयल यांची एका व्यापाऱ्यासोबत किरकोळ कारणावरून रविवारी (२६ ऑगस्ट) सकाळी ११च्या सुमारास बाचाबाची झाली. प्राप्त माहितीनुसार व्यापाऱ्याचा मुलगा गोडाऊनमध्ये गेला होता. दरम्यान, गाडी पार्क करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेत्याचा गाडीचालक आणि व्यापाऱ्याच्या मुलात किरकोळ वाद झाला.
देखें बीजेपी नेता की गुंडई- https://t.co/F2INIYeSlD
— Abhishek Gupta (@kalamkafakeer) August 27, 2018
गाडीचालकाने या वादाची माहिती आपल्या नेत्याला दिली. त्यानंतर हा नेता (गोयल) अल्पावधीतच घटनास्थळी आला. त्यानंतर गोयलने व्यापारी आणि त्याच्या मुलाला लाठ्य़ा-काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आपण पोलिसांमध्ये तक्रार करण्यासाठी गेलो. मात्र, तेथे तक्रार करू नये यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप पीडित व्यापाऱ्याने केला आहे. दरम्यान, आम्ही गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.