शेताच्या खोदकामात सापडल्या देवी देवतांच्या मूर्ती; पोलिसांनी असं केलं पितळ उघडं

मूर्ती बाहेर काढल्यानंतर त्यांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली

Updated: Sep 1, 2022, 07:13 PM IST
शेताच्या खोदकामात सापडल्या देवी देवतांच्या मूर्ती; पोलिसांनी असं केलं पितळ उघडं title=

उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) उन्नाव (unnao) येथील एका कुटुंबावर लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळल्याचा आरोप केला. उन्नाव जिल्ह्यातील हसनगंजच्या मेहमूदपूरमध्ये शेतात खोदकामात पिवळ्या धातूच्या मूर्ती सापडल्याची खोटी कथा एका तरुणाने रचली होती. त्यानंतर या व्यक्तीने आणि त्याच्या मुलांनी लोकांची फसवणूक केली.

या व्यक्तीने आणि त्याच्या मुलांनी 169 रुपयांना देवीच्या मूर्ती ऑनलाईन (online) मागवल्या आणि असिवानच्या मेहमूद गावात एका शेतात पुरल्या. यानंतर शेतात नांगरणी करताना प्राचीन मूर्ती बाहेर पडत असल्याचा दावा त्यांनी केला. खोदकाम केले तेव्हा खड्ड्यात लक्ष्मी, सरस्वती, कुबेर या मूर्तींव्यतिरिक्त रुद्राक्ष, चावी, नाणे, कासव, गोवऱ्या बाहेर काढण्यात आल्या. हे बघून लोकांची गर्दी जमली आणि 70 हजार रुपयेही देणगी स्वरूपात जमा झाले.

ज्या ठिकाणी देवीच्या मुर्त्या निघाल्या त्या ठिकाणी मंदिर बांधणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पण डिलिव्हरी बॉयचा जबाब आणि पुरावे मिळाल्यानंतर त्यांची फसवणूकीची योजना अयशस्वी ठरली.

यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अशोक कुमार, त्यांचा मुलगा रवी कुमार आणि कपिल या तिघांना ताब्यात घेतले आहे. सर्कल ऑफिसर पंकज सिंह यांनी सांगितले की, आरोपींना सीआरपीसीच्या कलम १५१ अंतर्गत दंड ठोठावण्यात आला.

या कुटुंबाने मिळून निष्पाप गावकऱ्यांना फसवण्याचा प्लॅन केला. आम्ही मूर्ती ताब्यात घेतल्या असून संपूर्ण कटाची माहिती गावकऱ्यांना दिली आहे. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी या मूर्ती ऑनलाइन खरेदी करून पुरण्यात आल्याचे पंकज सिंह यांनी सांगितले.

स्टेशन हाऊस ऑफिसर असिवान अनिरुद्ध सिंह यांनी सांगितले की, कुटुंबाचा दावा आहे की मूर्ती 500 वर्षांहून अधिक जुन्या आहेत. त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ला यासंदर्भातील माहिती दिली. 

दरम्यान, डिलिव्हरी बॉय गोरेलालने पोलिसांशी संपर्क साधला. गोरेलालने सांगितले की तो डिलिव्हरी मॅन म्हणून काम करतो. त्यांनी त्या मूर्ती अशोक कुमार यांचा मुलगा रवी याला दिल्या होत्या, त्या बदल्यात त्यांनी त्यांना १६९ रुपयेही दिले होते. 

पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी अशोककुमारची चौकशी केली. मात्र तोपर्यंत गावकऱ्यांची मूर्तींवर अपार श्रद्धा जडली  होती. त्यांनी पोलिसांनी विरोध केला.  या मूर्ती पुरातन नसून ऑनलाईन विकत घेतल्या गेल्या यावर लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते. पोलिसांच्या तपासानंतर खुलासा झाल्यानंतर गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.