जेवणाची तक्रार केली म्हणून 600 किलोमीटर लांब बदली; पोलीस प्रशासनातील प्रकार

मेसमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत या पोलीस हवालदाराने आवाज उठवला होता

Updated: Sep 25, 2022, 10:24 AM IST
जेवणाची तक्रार केली म्हणून 600 किलोमीटर लांब बदली; पोलीस प्रशासनातील प्रकार title=

उत्तर प्रदेश : निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) पोलीस कॉन्स्टेबलची (Police constable) 600 किलोमीटर लांब गाझीपूर (Ghazipur) जिल्ह्यात बदली (transfer) करण्यात आली आहे. 10 ऑगस्ट रोजी फिरोजाबाद (Firozabad) येथील एका कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाला होता. कॉन्स्टेबल मनोज कुमारने मेसमध्ये (mess) खराब जेवण दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता मनोज कुमारची (Manoj Kumar) फिरोजाबादहून गाझीपूरला बदली करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल मनोज अलीगढ (Aligarh) जिल्ह्यातील आहे. मनोजची आता वाराणसी झोन ​​अंतर्गत येणाऱ्या गाझीपूर येथे बदली करण्यात आली आहे. (UP Police constable who raised the issue of poor quality food transferred 600 km)

या बदलीच्या आदेशानंतर मनोज कुमारने प्रतिक्रिया दिली आहे.  टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, "माझ्या कुटुंबात सहा लोक आहेत. त्यात दोन लहान भाऊ आणि एका बहिणीचा समावेश आहे. बहिणीचे लग्न झालेले नाही. माझे आई-वडील वृद्ध आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 600 किलोमीटर दूर राहून त्यांचा सांभाळ करणे मला खूप कठीण आहे. मी माझ्या कुटुंबातील एकमेव कमावणारा व्यक्ती सदस्य आहे," असे मनोजने म्हटलं आहे.

10 ऑगस्ट रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल मनोज कुमारने (Manoj Kumar) पोलीस मुख्यालयाच्या गेटवर जेवणाचे ताट घेऊन त्याबाबत तक्रार केली होती. पोलीस मुख्यालयाच्या गेटबाहेर पत्रकारांसमोर जेवणाबाबत तक्रार करत असताना मनोज रडू लागला. त्याच्यावर दबाव आणला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

“इथं ऐकणारं कोणी नाही. कॅप्टन साहेबांनी आधी ऐकले असते तर त्यांना इथे येण्याची गरजच पडली नसती. कॅप्टन साहेब बाहेर आल्यावर मी त्यांना सांगितले की तुम्ही यातील 5 चपात्या खा. किमान 12 तासांच्या ड्युटीनंतर तुमचे कर्मचारी काय खातात हे तरी जाणून घ्या. मला फक्त तुम्हाला विचारायचे आहे की तुमची मुले-मुली या चपात्या खाऊ शकतील का? ऐकायला कोणी नाही, मला सकाळपासून भूक लागली आहे," असं मनोज कुमार म्हणाला होता.

"कोणाला सांगू, माझे आई-वडील इथे नाहीत. मेसच्या मॅनेजरकडून धमकी आली आहे की, जर तू लोकांसमोर जेवणाच ताट गेलास तर तुला नोकरीवरून काढून टाकू. तुम्हीच सांग माझ्यावर अत्याचार झाला की नाही?" पोलीस महासंचालकांना (DGP) फोन केला तर त्यांच्या कर्मचाऱ्याने फोन कट कर नाहीतर कामावरून काढून घरी पाठवेल असं सांगितलं. अतिरिक्त पोलीस महासंचालकांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही. अधिकारी ऐकायला तयार नसतील तर तक्रार कोणाकडे करायची ते तुम्हीच सांगा, असं मनोज लोकांना सांगताना दिसत होता.

याआधीही मनोजने मेसमधल्या जेवणाचा व्हिडिओ बनवला होता. यामध्ये इथे असच काम चालतं, कच्च्या चपात्या खाऊन पोलीस वैतागले आहेत. याबाबत तक्रार केली, मात्र कारवाई झाली नसल्याचे मनोजचे म्हणणे होते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फिरोजाबाद पोलिसांनी सांगितलं की, पोलीस लाइन अधिकाऱ्याला चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानंतर फिरोजाबाद पोलिसांनी ट्विट करत, "मेसच्या जेवणाच्या गुणवत्तेशी संबंधित तक्रारीची चौकशी केली जात आहे. तसेच तक्रारदार हवालदाराला गैरहजर राहणे आणि निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये गेल्या वर्षांत 15 वेळा शिक्षा झाली आहे," असं म्हटलं होतं.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही योगी आदित्यनाथ सरकारवर या मुद्द्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता या पोलीस हवालादाराची थेट 600 किमी लांब बदली करण्यात आली आहे.