PUBG गेममुळे मानसिक संतुलन बिघडलं, मुलाने मारहाण करत आई-वडिलांनाच संपवलं

मोबाईलवर त्या तरुणाला PUBG खेळाचं व्यसन जडलं होतं. यामुळे तो हिंसक झाला होता आणि यातूनच त्याचं मानसिक संतुलनही बिघडलं होतं. गेल्या दोन वर्षा त्याची प्रकृती आणखी खालावली. पण याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांना भोगावा लागला.   

राजीव कासले | Updated: Aug 5, 2023, 09:08 PM IST
PUBG गेममुळे मानसिक संतुलन बिघडलं, मुलाने मारहाण करत आई-वडिलांनाच संपवलं title=

PUBG : पब्जी गेमवर आपल्या देशात बंदी घालण्यात आली आहे.  पण  वेगळे अॅप्लिकेशन वापरुन अनेकजण हा गेम खेळत असतात. या खेळामुळे मुलांच्या शारीरिक-मानसिक परिस्थिीतीवर वाईट परिणाम होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातून अनेक मुलं हिंसक (Violent) झाल्याच्याही घटना आपण ऐकत असतो. अशीच एक धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे. पबजी (PUBG) खेळाचं व्यसन जडलेल्या एका मुलाने आपल्या आई-वडिलांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याने आई-वडिलांची हत्या (Son Killed Parents) केल्याची कबुली दिली आहे. 

काय आहे नेमकी घटना?
उत्तरप्रदेशमधल्या झांसी इथली ही घटना आहे. सकाळी दुधवाला दूध देण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याला दिसले. त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमला पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासात मुलानेच आपल्या आई वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं. झांसी शहरातल्या नवाबादमधल्या गुमनाबार परिसरात 60 वर्षांचे लक्ष्मी प्रसाद ,55 वर्षांची विमला आणि 28 वर्षांचा मुलाग अंकित यांच्याबरोबर राहातात. लक्ष्मीप्रसाद हे पेशाने शिक्षक होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा अंकितने लाकडी दांडक्याने मारहाण केली. याता आई-वडिल दोघंही गंभीर जखमी झाले. वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर आईचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलगा अंकितची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्याला पबजी खेळचा व्यसन होतं. तासनतास तो या खेळात गुंतलेला असायचा. भूक-तहान, झोप विसरून तो मोबाईलमध्ये पबजी खेत होता. या खेळात तो इतका गुंतला की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि मानसिक स्थिती बिघडली. यात त्याची प्रकृती ढासळत गेली.

शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंकित हिंसक होत गेला होता. आई-वडिलांबरोबर तो भांडण करायचा. घटनेच्या दिवशी असंच भांडण झालं आणि त्याने लाकडी दांडक्याने आई-वडिलांना मारहाण केली. यात वडिल लक्ष्मीप्रसाद आणि आई विमला या दोघांचाही मृत्यू झाला. दोघंही रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर अंकित तिथेच एका कोपऱ्यात बसून राहिला. सकाळी जेव्हा दूधवाला आला तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

मुलाने हाताची नस कापून घेतली
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्येच पब्जी गेम खेळताना एका अल्पवयीन मुलाने हाताची नस आणि हाताची तीन बोटं कापून घेतली.  उत्तर प्रदेशातल्या बरेली इथं ही घटना घडली. कुटुंबियांनी मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. बरेलीच्या भामोरा इथं राहणारा हा पाचव्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्याला PUBG खेळाची प्रचंड आवड होती, ही आवड हळुहळू व्यसनामध्ये कधी बदलली हे त्याला आणि त्याच्या पालकांना कळालं नाही.