Wedding: होणाऱ्या नवऱ्याला नोटा मोजता येत नाही म्हणून लग्नमंडपातून पळून गेली नववधू

UP Bride Cancels Wedding As Groom Fails To Count Notes: मुलीच्या घरच्यांनी लग्नमंडपात या मुलाची चाचणी घेण्याचा निर्णय घेत त्याच्या हातात काही नोटा दिल्या आणि या नोटा मोज असं सांगितलं.

Updated: Jan 25, 2023, 03:07 PM IST
Wedding: होणाऱ्या नवऱ्याला नोटा मोजता येत नाही म्हणून लग्नमंडपातून पळून गेली नववधू title=
UP Bride Cancels Wedding

लग्न आणि आयुष्याचा जोडीदार शोधताना आपल्याप्रमाणेच तो आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्तरावर तोलामोलाचा असावा अशी जवळजवळ प्रत्येकाची अपेक्षा असते. एकमेकांना समजून घेणारा असावा याबरोबरच हुशार जोडीदाराच्या प्रत्येकजण शोधात असतो. आर्थिक परिस्थितीही आपल्यासारखी किंवा आपल्याहून अधिक चांगली असणाऱ्या जोडीदाराला सामान्यपणे अरेंज मॅरेजमध्ये प्राधान्य देण्याकडे वधू-वरांबरोबरच त्यांच्या पालकांचाही कल असतो. मात्र अनेकदा या इच्छा पूर्ण होत नाही आणि लग्न करताना काही गोष्टी अॅडजेस्ट करुन घ्याव्या लागतात. यामध्ये अगदी लाइफस्टाइलपासून ते आर्थिक तडजोडीपर्यंतच्या अनेक गोष्टी असतात. मात्र अशावेळी समोरच्या व्यक्तीमधील कौशल्य आणि गुण पाहून बरेच जण लग्नासाठी तयारही होतात. असं असलं तरी उत्तर प्रदेशमध्ये एक लग्न गणिताचं ज्ञान कमी असल्याने मोडलं असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

आपल्या होणाऱ्या पती किंवा पत्नीकडून प्रत्येकाला काही किमान अपेक्षा असतात. काहीजण यानुसार बदलण्यास तयार अशतात मात्र काहीजण स्वत:मध्ये बदल करण्यास तयार नसतात. असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडला जेव्हा नवरीने नवऱ्या मुलाला पैशांच्या नोटाही मोजता येत नसल्याचं समोर आलं. फारुखाबादमधील रिता सिंह या तरुणीने नवऱ्या मुलाला नोटा मोजता येत नसल्याचं कारण देत लग्न मोडलं आहे. नवऱ्या मुलाला देण्यात आलेल्या 10 रुपयांच्या काही नोटा मोजता आल्या नाही त्यामुळे या मुलीने त्याच जागी लग्न मोडलं.

लग्न समारंभामध्ये भटजींनी बोलता बोलता मुलीच्या कुटुंबियांना मुलाला नोटा मोजता येत नसल्याचं सांगितलं. मात्र हे ऐकल्यानंतर मुलीच्या घरच्यांनी या नवऱ्याची चाचणीच घेण्याचं ठरवलं. हे वागणं विचित्र असल्याचं वाटल्याने मुलीच्या कुटुंबियांनी प्रत्यक्षात चाचपणी करण्याचा निर्णय घेतला. नवरीकडच्या लोकांनी नवऱ्याच्या हातात 10 रुपयांच्या 30 नोटा दिल्या आणि या मोजून दाखव असं सांगितलं. मात्र नवरा मुलगा या चाचणीत नापास झाला. 

आपल्या होणाऱ्या नवऱ्याला साध्या 30 नोटाही मोजता येत नसल्याचं पाहून मंडपात बसलेली रिता चांगलीच संतापली आणि तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. मुलाला नोटा मोजता येत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिता मंडपातून उठून बाहेर निघून गेली. मात्र मुलीच्या कुटुंबियांनी तिची बाजू घेत नवऱ्या मुलाच्या या 'मानसिक स्थिती'बद्दल आपल्याला कल्पना देण्यात आली नव्हती असा दावा केला. "चांगल्या विचाराने लग्न लावली जातात. या लग्नासाठी मध्यस्थी करणारी व्यक्ती आमच्या कुटुंबाच्या जवळची असल्याने आम्ही प्रत्यक्षात मुलाला न भेटता लग्नास मंजुरी दिली. जेव्हा भटजींनी आम्हाला मुलासंदर्भातील ही गोष्ट सांगितली तेव्हा आम्ही त्याच्या हातात 30 नोटा दिला. 10 रुपयांच्या या नोटा त्याला मोजतात का हे आम्हाला पहायचं होतं. मात्र त्याला ते जमलं नाही तेव्हा रिताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला," असं रिताचा भाऊ मोहितने सांगितलं आहे. 

यानंतर मंडपात मोठा गोंधळ झाल्यानंतर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. मात्र रिताने लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहत आपला निर्णय बदलला नाही. त्यामुळे रात्री उशिरा मुलाची वरात नववधूशिवाय घरी परतली.