उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगर यांची भाजपमधून हकालपट्टी

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी रविवारी रायबरेलीच्या अतरेली गावानजीक झालेल्या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झाली होती.

Updated: Aug 1, 2019, 01:27 PM IST
उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगर यांची भाजपमधून हकालपट्टी title=

नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या अपघातानंतर देशभरात निर्माण झालेल्या रोषाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपकडून मोठा निर्णय घेण्यात आला. या बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सेंगर यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी रविवारी रायबरेलीच्या अतरेली गावानजीक झालेल्या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झाली होती. या अपघातात पीडित तरुणीची काकी आणि मावशीचा जागीच मृत्यू झाला. तर वकील महेंद्र सिंह हेदेखील गंभीर जखमी झाले होते. 

यानंतर कुलदीप सेंगर आणि अन्य नऊ जणांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

कुलदीप सेंगर हे भाजपचे बंगरमाऊ मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. २००२ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. सर्वप्रथम त्यांनी बसपाच्या तिकीटावर निवडून आले होते. यानंतर २००७ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बंगरमाऊ मतदारसंघातून निवडून आले. तर २०१२ मध्ये त्यांनी सपाच्या तिकीटावर भागवत नगरमधून निवडणूक लढवली होती. तेव्हाही त्यांचा विजय झाला होता. यानंतर २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीवेळी सेंगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

उन्नाव बलात्कार - हत्या : तिची चूक एवढीच की, तिनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला...

कुलदीप सेंगर यांना पाठिशी घालत असल्यावरून भाजपला अनेकदा टीकेलाही सामोरे जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार साक्षी महाराज यांनी तुरुंगात जाऊन कुलदीप सेंगर यांची भेट घेतली होती. यावरूनही बराच वाद निर्माण झाला होता.