केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली; गृहमंत्री संसदेत करणार निवेदन

अधिवेशनाचे कामकाज सुरू झाल्यानंतर केंद्र सरकार काश्मीरबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

Updated: Aug 5, 2019, 10:50 AM IST
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली; गृहमंत्री संसदेत करणार निवेदन title=

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या काश्मीरसंदर्भात सोमवारी ठोस आणि मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर कोणतीही पत्रकार परिषद झालेली नाही. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ११ वाजता संसदेत निवदेन देणार आहेत. यावेळी ते काश्मीरसंदर्भात कोणतीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 

तत्पूर्वी जम्मू-काश्मीर सरकारने रविवारी लागू केलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तर श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. जम्मूतील ८ जिल्ह्यांमध्ये लष्कराच्या ४० कंपनी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय, काश्मीरमधील स्थानिक पक्षांच्या प्रमुखांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांचा समावेश आहे. 

काश्मीरला वाजपेयींची सर्वात जास्त उणीव आता जाणवतेय- मेहबुबा मुफ्ती

श्रीनगरमधील जमावबंदी १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू राहील. याशिवाय, रविवारी संध्याकाळपासून परिसरातील मोबाईल, ब्रॉडबँड, इंटरनेट आणि केबल टीव्ही सेवाही बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

श्रीनगरमध्ये १५ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांसह प्रमुख नेते नजरकैदेत