मुंबई : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. देशातील ३० लाख कर्मचाऱ्यांना केंद्राने दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. कोरोनाचे संकट असताना सगळेच ठप्प झाले आहे. दरम्यान, अनलॉक सुरु झाल्यानंतर अर्थव्यवस्था हळूहळू गती घेत आहे. आता केंद्राने दिवाळी बोनस जाहीर केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आज ३० लाख विना-राजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळीचा बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बोनस वितरित करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दसऱ्यापासूनच दिवाळी सुरू होणार आहे.
Union Cabinet approves bonus for 30 lakh non-gazetted employees of central govt through DBT
Read @ANI Story | https://t.co/PYK0HDMvCB pic.twitter.com/ALjLb5qcIS
— ANI Digital (@ani_digital) October 21, 2020
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत बोनसवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ३० लाख कर्मचाऱ्यांना बोनस देत असल्याची माहिती दिली. जावडेकर म्हणाले की, दसऱ्याच्या अगोदर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर(डीबीटी)द्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात थेट बोनसची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कॅबिनेटमध्ये २०१९-२०२० साठी प्रोडक्टिव्ह लिंक्ड बोनस (PLB) आणि नॉन प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण ३ हजार ७४० कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ३० लाख विना-राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, असे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.