Union Budget 2023: कशासाठी किती पैसै खर्च करायचे? या नऊ व्यक्ती बनवणार देशाचा बजेट

टॅक्स किती भरावा लागणार? कर्जाचा बोजा हलका होणार की वाढणार? कोणत्या वस्तू स्वत होणार काय महाग होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असते. मात्र, आपल्या देशाचे बजेट (Budget 2023) कोण बनवतं? असा प्रश्नही नागरिकांना पडतो. यंदाचे बजेट (Union Budget 2023) तयार करण्यात भारतातील या नवरत्नांनी महत्त्वाची भूमिका आहे.

Updated: Jan 11, 2023, 06:09 PM IST
Union Budget 2023:  कशासाठी किती पैसै खर्च करायचे? या नऊ व्यक्ती बनवणार देशाचा बजेट title=

Union Budget 2023: बजेट ठरवूनच अनेक जण त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे प्लानिंग करतात. संपूर्ण देशाचे लक्ष अर्थसंकल्प (Budget 2023) अर्थात बजेटकडे लागले आहे. बजेटकडून देशवासीयांच्या अनेक अपेक्षा आहेत. टॅक्स किती भरावा लागणार? कर्जाचा बोजा हलका होणार की वाढणार? कोणत्या वस्तू स्वस्त होणार, काय महाग होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, आपल्या देशाचे बजेट कोण बनवतं? असा प्रश्नही नागरिकांना पडतो. यंदाचे बजेट तयार करण्यात भारतातील या नवरत्नांनी महत्वाची भूमिका बजावली आहे(Union Budget 2023). 

आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारसाठी यंदाचे बजेट अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कारण बजेटनंतर राजकीय गणितं देखील बदलणार आहेत. राजकारणातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या बजेटनंतर घडू शकतात. मोदी सरकार येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी आपला शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर या बजेटची जबाबादारी आहे.  सीतारामन यांच्यासह नऊ जणांची एक विशेष टीम यावर काम करत आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल,  अर्थ मंत्रालयाचे सचिव टीव्ही सोमनाथन, अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे प्रभारी सचिव अजय सेठ, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे, महसूल सचिव संजय मल्होत्रा, मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या सचिव विवेक जोशी, मुख्य आर्थिक अधिकारी व्ही अनंत नागेश्वरन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर शक्तिकांत दास हे बजेटवर काम करत आहेत. अर्थसंकल्पाचा मसुदा जवळपास तयार झाला असून यावर अंतिम चर्चा सुरु आहे. 

1. निर्मला सीतारामन 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी रोजी 2023-24 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निर्मला या सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे  आहे.  निर्मला सीतारामन यांनी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेतले आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जी ती यशस्वीपणे पार पाडली होती. 

2. पियुष गोयल 

पियुष गोयल हे देशाचे वाणिज्य मंत्री आहेत. यामुळे बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग महत्वाचा आहे. थेट परदेशी गुंतवणुक अर्थात एडीआय करारांबबात ते सक्रिय आहेत. थोड्या कालावधीसाठी का होईना अर्थमंत्रालय हाताळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. 

3. टीव्ही सोमनाथन

वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांची देखील बजेट तयार महत्वाची भूमिका आहे. सोमनाथन हे तामिळनाडू केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या भांडवली खर्चाने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

4. अजय सेठ

अर्थसंकल्प तयार करणाऱ्यांच्या नव रत्नांच्या यादीत एक महत्त्वाचे नाव म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे प्रभारी सचिव अजय सेठ यांचे आहे. बजेटशी संबंधित इनपुट आणि विविध प्रकारचे आर्थिक विवरण तयार करण्यात ते प्रमुख भूमिका बजावतात.

5. तुहीन कांत पांडे

तुहिन कांत पांडे हे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव आहेत. सरकारने निर्गुंतवणुकीच्या क्षेत्रात केलेल्या उपलब्धींमध्ये तुहीन यांचा मोलाचा वाटा आहे. एलआयसीचा आयपीओ आणण्यात आणि एअर इंडियाचे खासगीकरण करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

6. संजय मल्होत्रा

नुकतेच नियुक्त झालेले महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांच्यावर देखील या बजेटची महत्वाची जबाबदारी आहे. राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा सरकारच्या धोरण आणि महत्त्वाकांक्षेशी सुसंगत आहेत याची खात्री करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा आणि त्यांचा प्रत्याक्षात होणारा परिणाम हे क्रॉस चेक करण्याचे काम त्यांच्यावर आहे. 

7. विवेक जोशी 

विवेक जोशी  हे अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव आहेत. 19 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या सचिवपदी निवड झाली आहे.  विवेक जोशी यांचेही बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान आहे. वित्तीय सेवा विभागाच्या सचिवपदी निवड होण्याआधी ते  गृह विभागांतर्गत कुलसचिव आणि जनगणना संचालक होते.

8. व्ही अनंत नागेश्वरन 

2022 च्या अर्थसंकल्पापूर्वीच  व्ही अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून निवड झाली. 2022-23 या आर्थिक सर्वेक्षणाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

9. शक्तिकांत दास 

शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर आहेत. ते 1980 च्या बॅचचे तामिळनाडू केडरचे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत. 12 डिसेंबर 2018 पासून  शक्तीकांता दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत. देशातील महागाई नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न असो किंवा सरकारच्या आर्थिक धोरणांचा बचाव असो, त्यांनी नेहमीच आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.