देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 'पीएम किसान सन्मान निधी योजना' (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची कमाई दुपट्टीने वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर २०१९ साली 'पीएम किसान सन्मान निधी योजना' सुरु करण्यात आली. 'पीएम किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत १३ व्या हफ्त्याची (13th Installments) सध्या शेतकरी वाट पाहत आहेत. मात्र सध्या तरी यासंदर्भात सरकारने कोणतीही अधिकृत माहिती अथवा आकडेवारी दिलेली नाही. मात्र तुम्हीसुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला नसेल तर १३ वा हफ्ता हा तुमच्यासाठी पहिला हफ्ता ठरु शकतो. या योजनेसाठीच्या अटी आणि शर्थी पूर्ण करत असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र शेतकरी पती-पत्नी एकाचवेळी या योजनेचा लाभ घेऊ शकतात का? याबद्दल शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम आहे. याचसंदर्भातील नियम काय आहेत जाणून घेऊयात...
'पीएम किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही मदत दोन दोन हजारांच्या तीन हफ्त्यांमध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. दर चार महिन्यांनी हे योजनेच्या लाभधारकांच्या खात्यावर दोन हजार रुपये थेट जमा केले जातात. मात्र एकाच वेळी पती आणि पत्नी शेतकरी म्हणून योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. पती किंवा पत्नी या दोघांपैकी एकालाच या योजनेचा लाभ घेता येतो.
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्याला या योजनेचा लाभ घेता येतो. मग ही शेतजमीन पतीच्या नावे असो किंवा पत्नीच्या दोघांपैकी एकालाच योजनेचा लाभ घेता येतो. एकाच वेळी पती पत्नी एकाच जमीनीच्या तुकड्यावर मालकी हक्क सांगत योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
> शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती कर भरत असेल तर अशा कुटुंबाला या योजनेचा फायदा मिळत नाही.
> ज्यांच्याकडे स्वत:च्या नावावर शेतजमीन नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
> शेतजमीन असूनही ती वडील किंवा आजोबांच्या नावे अथवा कुटुंबातील इतर सदस्याच्या नावे असेल तरी या जमीनीवर राबणाऱ्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
> शेतजमीन नावावर असूनही एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर तिला या योजनेचे लाभ मिळत नाही.
> नोंदणीकृत डॉक्टर, इंजिनिअर, वकील, चार्डट अकाऊटंट यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
> एखाद्या शेतकऱ्याला वर्षाला दहा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
'पीएम किसान सन्मान निधी योजने'अंतर्गत या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केव्हायसी करणं बंधनकारक आहे. ई-केव्हायसी केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावर 'पीएम किसान सन्मान निधी योजने'च्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हफ्ता जमा होत नाही.