Thackeray Shivsena slams PM Modi: जम्मू-कश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढत असतानाच दहशतवादी हल्लेही वाढत असल्याकडे ठाकरेंच्या पक्षाने लक्ष वेधलं आहे. थेट आकडेवारी देत ठाकरेंच्या पक्षाने पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरमध्ये करत असलेले दहशतवाद संपल्यासंदर्भातील दावे फोल असल्याचं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम जसजसे वाढत आहेत तसेतसे तेथील दहशतवादी हल्ल्यांचे धमाकेही वाढत आहेत, असं म्हणत ठाकरेंच्या पक्षाने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे.
"जम्मू-कश्मीरमध्ये 370 कलम हटविल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान दोन दिवसांवर आले आहे. 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी उरलेले मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र त्याचवेळी दहशतवादी हल्ल्यांचे धमाकेही तेवढ्याच जोरात होताना दिसत आहेत. एकीकडे प्रचाराचे ढोल तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या बंदुकांमधून सुटणाऱ्या गोळ्या, बॉम्बचे धमाके, भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील वाढत्या चकमकी असे भयंकर चित्र सध्या जम्मू-कश्मीरमध्ये दिसत आहे. तरीही पंतप्रधान मोदी कश्मीरमधील दहशतवाद कमी झाल्याचे तुणतुणे वाजवीतच आहेत," असा टोला 'सामना'च्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. "दोन दिवसांपूर्वी मोदी यांनी कश्मीरातील दोडा येथे प्रचारसभा घेतली. 40 वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांची या ठिकाणी सभा झाली वगैरे ढोल मोदी भक्त आणि भाजपच्या मंडळींनी वाजविले. मात्र मोदींची सभा होत असतानाच कश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात नायब सुभेदार विपनकुमार आणि शिपाई अरविंद सिंह हे दोघे हुतात्मा झाले. बारामुल्ला जिल्ह्यातही भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. त्यात तीन दहशतवादी मारले गेले असले तरी तेथील चकमक नंतरही सुरूच होती. एका दहशतवाद्याला सोमवारी कंठस्नान घालण्यात आले. जम्मू-कश्मीरमध्ये आपले लष्करी जवान बहादुरी दाखवीत विधानसभा निवडणुकीवर असलेले दहशतवादी हल्ल्यांचे विघ्न दूर करीतच आहेत, परंतु कश्मीरमधून दहशतवाद संपविल्याचा कांगावा करणाऱ्या मोदी-शहांचे काय?" असा सवाल उद्धव ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
"दोडा येथे मोदींची सभा होत असताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवानांना हौतात्म्य येते. तरीही ‘कश्मीरमध्ये दहशतवाद शेवटची घटका मोजत आहे,’ असा दावा मोदी प्रचार सभेत करतात, स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतात. वास्तविक, ना जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत, ना सीमेवरील चकमकी कमी झाल्या आहेत, ना तेथील घुसखोरी. उलट जो जम्मू प्रांत दहशतवादी हल्ल्यांपासून बऱ्यापैकी मुक्त होता त्याच जम्मूमध्ये हल्ले वाढले आहेत. कश्मीर खोरे तर आधीपासूनच दहशतवादग्रस्त आहे; परंतु आता जम्मूदेखील दहशतवादी हल्ल्यांच्या तडाख्यात सापडले आहेत. वर्षभरात कश्मीरमधील हल्ल्यांमध्ये 41 दहशतवादी मारले गेले असले तरी सुरक्षा दलाचे 20 जवानदेखील शहीद झाले. 18 निरपराध नागरिकांचा बळी गेला. मागील 75 दिवसांत जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल 13 दहशतवादी हल्ले झाले. त्यात 14 जवान शहीद झाले तर 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला गेला आणि तरीही मोदी ‘दहशतवाद शून्यावर आणला,’ असे कुठल्या तोंडाने सांगत आहेत?" असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.
"तुमच्या म्हणण्याप्रमाणे दहशतवाद खरोखर कमी झाला असेल तर मग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हजारो अतिरिक्त सुरक्षा जवान तुम्हाला जम्मू-कश्मीरमध्ये का तैनात करावे लागत आहेत? छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही. जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांचे हेच सुरू आहे. अन्यथा, दोडा येथील प्रचारसभेत ‘दहशतवाद शून्यावर’ आणल्याचा भन्नाट दावा त्यांनी केलाच नसता. मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी जम्मू-कश्मीरमधील वाढते दहशतवादी हल्ले त्यांचे दावे रोजच्या रोज पोकळ ठरवीत आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडघम जसजसे वाढत आहेत तसेतसे तेथील दहशतवादी हल्ल्यांचे धमाकेही वाढत आहेत. हेच जम्मू-कश्मीरचे दाहक वास्तव आहे. मोदी-शहांना ते मान्य नसले तरी कश्मीरची जनता मोदींचा कांगावा आणि वास्तव यातील फरक ओळखून आहे," असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.