Uddhav Thackeray On Bangladesh Crisis: दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात भाष्य करताना हे अत्याचार आणि हत्या थांबवण्याचं काम भारत सरकारचं असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना ते मणिपूरमध्ये तर गेले नाहीत मात्र बांगलादेशमध्ये त्यांनी जावं असं म्हटलं आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज उद्धव ठाकरे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेणार असून त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शेख हसीना अजूनही भारतात आहेत, असं म्हणत पत्रकारांनी बांगलादेशसंदर्भात उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला. "जगभरात आपण पाहिलं तर जनतेचा संयम तुटत आहे. मध्यंतरी इस्रायलमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. तिथल्या पंतप्रधानांना घराबाहेर पडता येत नव्हतं. आता बांगलादेशमध्ये असं झालं आहे. मध्यंतरी श्रीलंकेमध्ये असं झालं होतं. एकूणच काय तर सर्वसामान्य जनता ही सर्वोच्च असते. तिच्या सहनशीलतेचा अंत कोणत्याही राज्यकर्त्याने पाहू नये. तो पाहिला तर जनतेचं न्यायालय काय असतं ते वेळोवेळी अगदी कालच्या बांगलादेशमधील घटनेनं दाखवून दिलं आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे अन्य एका पत्रकाराने, हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, "बांगलादेशमधील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवणे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आम्ही तिकडे जाऊन काही करु शकू अशातला भाग नाही. जर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील तर सध्या आपलं अधिवेशन सुरु आहे. कालच एक सर्वपक्षीय बैठक गृहमंत्र्यांनी बोलवली होती. ती नुसती माहिती देण्यासाठी होती का? असं असेल तर त्या बैठकीला काही अर्थ नव्हता," असं म्हटलं आहे.
हिंदूंवरील अत्याचारासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरेंनी भारतामधील स्थितीवर भाष्य केलं. "आपल्याकडे मणिपूर अजून पेटलेलं आहे. काश्मीरमध्येही हिंदूंच्या हत्या होत आहेत. आता बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या होत असतील तर केंद्र सरकारने ताबडतोब पावलं उचलून तिथल्या हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. जर शेख हसीनांना तुम्ही आश्रय देत असाल तर बांगलादेशमधील हिंदूंचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमचीच आहे," असं उद्धव ठाकरे केंद्र सरकारला उद्देशून म्हणाले.
"मणिपूरला तर नाही गेलेत पण मोदीजी आणि अमित शाहा बांगलादेशला जाऊ शकत असतील तर त्यांनी गेलं पाहिजे. तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवणे आणि हिंदूंचं रक्षण करणं हे भारत सरकारचं काम आहे. या बांगलादेशला इंदिराजींनी स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. तेथील हिंदूंच्या संरक्षणाची जबाबदारी भारत सरकारची आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.