सरकारी बंगल्यावरुन प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर

प्रियंका गांधी वाड्रा यांना लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली करण्याचं सांगण्यात आलं आहे.

Updated: Jul 14, 2020, 05:51 PM IST
सरकारी बंगल्यावरुन प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ट्विटर वॉर title=

नवी दिल्ली : लोधी इस्टेटमध्ये कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना देण्यात आलेल्या बंगल्यावरील वाद वाढला आसल्याचं चित्र आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि प्रियंका गांधी यांच्यात बुधवारी ट्विटर वॉर पाहायला मिळाला. ट्विटरवर प्रियंका गांधींनी, लोधी इस्टेट इथे राहण्यासाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मागितल्याची गोष्ट फेटाळून लावली आहे. प्रियंका गांधी यांच्या या ट्विटनंतर, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी प्रियंका गांधींना त्याबाबत ट्विट करत उत्तर दिलं आहे.

प्रियंका गांधी वाड्रा यांना लोधी इस्टेट भागातील सरकारी बंगला खाली करण्याचं सांगण्यात आलं आहे. लोधी इस्टेटमधील सरकारी बंगल्यावर आणखी काही दिवस राहण्यासाठी, सरकारकडे मुदतवाढ मागितल्याची बाब खोटी आहे. अशाप्रकारची कोणतीही मुदतवाढ मी मागितली नसून 1 ऑगस्टपर्यंत बंगला खाली करणार असल्याचं प्रियंका यांनी ट्विट करत सांगतिलं. 

प्रियंका यांच्या ट्विटला उत्तर देत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी, एका बड्या काँग्रेस नेत्याने 4 जुलै रोजी त्यांना फोन केला असल्याचं म्हटलंय. पुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये दावा केला की, फोन करुन नेत्याने, 35 लोधी इस्टेट, दुसऱ्या काँग्रेस खासदाराला द्यावा, जेणेकरुन प्रियंका गांधी तेथेच राहू शकतील, असं फोनवर सांगितलं असल्याचं पुरींनी ट्विट करत सांगितलं.

त्यावर प्रियंका गांधी यांनी, मी कोणत्याही मुदतवाढीसाठी विनंती केली नसून विनंती करणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे 1 ऑगस्टपर्यंत बंगला खाली करणार आहे, असं त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधींच्या या ट्विटवर पुरी यांनी ट्विट करत, मला फोन करणारे नेते काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांच्या विनंतीवरुन, आम्ही चांगल्या विश्वासाने दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं, पुरी यांनी सांगितलं.