पंतप्रधान मोदींनी 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा

ही रेल्वे 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलीय

Updated: Feb 15, 2019, 01:23 PM IST
पंतप्रधान मोदींनी 'वंदे भारत एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा  title=

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची बहुप्रतिक्षित 'ट्रेन-१८' (Train 18) किंवा ' वंदे भारत एक्सप्रेस'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी हिरवा झेंडा दाखवला. यापूर्वी भारताच्या सर्वात वेगवान रेल्वेचं पंतप्रधान मोदींनी निरिक्षण केलं. सामान्य नागरिक या रेल्वेतून प्रवास करण्याचा अनुभव १७ फेब्रुवारीपासून घेऊ शकतील. पंतप्रधान मोदींनी या रेल्वेला सकाळी ११.२५ वाजता हिरवा झेंडा दाखवत वाराणसीकडे रवाना केलं. 

शुक्रवारी नवी दिल्लीहून रवाना झालेली ही रेल्वे वाराणसीपर्यंत जाणार आहे. या रेल्वेतून रेल्वे अधिकाऱ्यांशिवाय पत्रकारही उपस्थित आहेत. ही रेल्वे चेन्नई इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आल्याची माहितीही यावेळी पंतप्रधानांनी दिली. 'मेक इन इंडिया' योजनेचं कौतुक करताना त्यांनी या रेल्वेनं योजनेला योग्य दिशा दिल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

शहिदांना श्रद्धांजली

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामामध्ये शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना दोन मिनिटे मौन पाळून उपस्थितांनी श्रद्धांजली दिली. या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं वक्तव्यही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलंय.

वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्टे...

- वंदे भारत ही देशातील सर्वात पहिली इंजिनशिवाय चालणारी सर्वात गतिशील रेल्वे आहे

- ही रेल्वे 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आलीय

- रेल्वेचे काही सुटे भाग मात्र परदेशातून आयात करण्यात आले आहेत

- या रेल्वेत स्पेनहून मागवण्यात आलेले विशेष सीट लावण्यात आल्यात. या सीट ३६० डिग्री अंशात फिरू शकतात

- ही रेल्वे तयार करण्यासाठी १०० करोड रुपयांचा खर्च आलाय

- या रेल्वेला ऑटोमॅटिक दरवाजे उपलब्ध करून देण्यात आलेत

- संपूर्ण रेल्वेत एसी उपलब्ध आहे

- या रेल्वेत १६ कोच असून एकावेळी या रेल्वेतून ११०० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात

- पहिल्या कोचमध्ये ड्रायव्हिंग सिस्टम लावण्यात आलंय तिथेच ४४ सीट देण्यात आलेत

- तर रेल्वेतील दोन एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये ५२ सीट असतील

- याशिवाय इतर कोचमध्ये ७८ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलीय