पुलवामा दहशतवादी हल्ला: मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय

देशभरात पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी

Updated: Feb 15, 2019, 03:08 PM IST
पुलवामा दहशतवादी हल्ला: मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने तातडीची बैठक बोलवत ५ मोठे निर्णय घेतले आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित होते.

मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय

१. पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९९६ पासून पाकिस्तानला भारताकडून व्यापारात सूट मिळत होती ती सूट आता बंद होणार आहे.

२. परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी सगळ्या देशांसोबत चर्चा करणार आहे. जगासमोर पाकिस्तानला खरा चेहरा आणण्यासाठी भारत पाऊल उचलणार आहे.

३. १९८६ मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाची परिभाषा बदलण्याचा प्रस्ताव दिला होता. आता हा प्रस्ताव पास करण्यासाठी आणखी प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रस्ताव पास करण्यासाठी इतर देशांवर दबाव टाकला जाणार आहे.

४. गृहमंत्री राजनाथ सिंह शनिवारी सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत राजनाथ सिंह पुलवामा हल्ल्याबाबत सर्व पक्षांसोबत विस्ताराने चर्चा करणार आहेत.

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी भारतीय जवानांना स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली आहे. आम्ही जवानांना कारवाईसाठी खुली सूट दिली आहे.

बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, आम्हाला जवानांचा अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची गळचेपी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बैठकीतील सगळेच निर्णय आता सांगता येणार नाहीत.

पुलवामामध्ये गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाले होते. सीआरपीएफच्या या ताफ्यात जवळपास २५०० जवान होते. या घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राग आहे. पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्त्यूतर देण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.