अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला...

अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 24, 2017, 11:11 AM IST
अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला... title=

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. 

उल्लेखनीय बाब म्हणजे, या दोन आरोपींनी मुलीला विकण्यासाठी वेश्यागृहाचा मालक समजून एका पोलीस अधिकाऱ्यालाच चुकून फोन केला... आणि पोलिसांनीही मोठ्या शिताफीनं त्यांना कोणताही संशय येणार अशा पद्धतीनं अलगद आपल्या जाळ्यात ओढलं... आणि अल्पवयीन मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका केली.

काय घडलं नेमकं?

'हिंदूस्तान टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, मध्य दिल्लीमधील जीबी रोड पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर सुनील कुमार या पोलीस अधिकाऱ्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला होता... अमर (वय २४) आणि रणजित शाह (वय २७) या दोघांना त्यांच्या एका मित्रानं त्यांना हा मोबाईल क्रमांक दिला होता... त्यामुळे चुकून पोलीस अधिकाऱ्याच्या फोनवर फोन करून आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी बोलणी सुरू केली.

सौदा केला पक्का

पोलीस अधिकाऱ्याच्या हे लक्षात येताच त्यांनी सतर्कता दाखवत आरोपींना आपण वेश्यागृह मालक बोलत असल्याचंच भासवलं. आरोपींशी त्यांनी मुलगी विकत घेण्याची डीलही पक्की केली... आणि आरोपींना नवी दिल्ली रेल्वे स्टेशनबाहेर भेटण्यासाठी बोलावलं.

आरोपींना अॅडव्हान्सही दिला

त्यानंतर, वेश्यागृह मालकाची माणसं म्हणून दोन पोलीसच आरोपींना रेल्वे स्टेशनवर भेटले... आरोपींनी पोलिसांकडे मुलीला विकण्यासाठी ३.५ लाखांची मागणी केली... पोलिसांनी २.३ लाखांवर ही डील पक्की केली... आणि आरोपी मुलीला खरेदीदारांना विकण्यास तयार झाले. २० हजार रुपये अॅडव्हान्स घेतल्यानंतर आरोपी ठरल्याप्रमाणे मुलीला घेऊन आले... मुलगी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर पोलिसांनी शिताफीनं आरोपींना अटक केली.

मुलगी कशी अडकली जाळ्यात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी बिहारमधील सापोल जिल्ह्याचे रहिवासी आहेत. अमरनं अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं... आणि काम मिळवून देण्याच्या बहाण्यानं दिल्लीला बोलावून घेतलं. ऑक्टोबर महिन्यात या मुलीनं आपलं घर सोडलं... आणि ती अमरसोबत दिल्लीत एका घरात आली... अमरनं तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले... त्यानंतर त्यानं मित्राच्या मदतीनं या मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा कट रचला. मिळालेल्या पैशांतून त्याला बाईक विकत घ्यायची होती, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली.