'विचारांशी असहमत व्यक्तींना देशद्रोही ठरवलं जातं', महुआ मोईत्रा पुन्हा चर्चेत

'पोलीस हा राज्याचा विषय आहे... परंतु, सरकार एनआयएलाच पोलिसांचा अधिकार बहाल करत आहे'

Updated: Jul 26, 2019, 10:50 AM IST
'विचारांशी असहमत व्यक्तींना देशद्रोही ठरवलं जातं', महुआ मोईत्रा पुन्हा चर्चेत title=

नवी दिल्ली : लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या सदस्य महुआ मोइत्रा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर आगपाखड केलीय. केंद्र सरकारनं मांडलेल्या 'बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा विधेयक २०१९'  (UAPA) या कायद्याला अतिशय धोकादायक, जनविरोधी आणि संविधानविरोधी सांगत जोरदार विरोध केला. UAPA वर चर्चेत भाग घेताना महुआ मोइत्रा यांनी हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली. परंतु, चर्चेअंती बेकायदा प्रतिबंधक हालचाली सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. 'दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक आहे' असं गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी म्हटलं. परंतु, यावेळीही महुआ मोइत्रा यांचं लोकसभेतील भाषण प्रभावी ठरलं. 

यावेळी बोलताना, 'सदनात सरकारच्या कोणत्याही धोरणाला विरोध केला तर विरोधकांना देशद्रोही ठरवलं जातं. आम्ही विरोधी पक्षात असल्यानं आम्हाला धोका का वाटतो?' असं महुआ मोइत्रा यांनी म्हटलं. यावर संसदीय कार्यराज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 'सरकारच्या कोणत्याही मंत्र्यानं विरोधकांना देशद्रोही म्हटलं नसल्याचं' म्हणत मोइत्रा यांचा विरोध केला. यावर 'मी कुणावर व्यक्तीगत आरोप केलेले नाहीत... मी हे वाक्य सामूहिक रुपात सरकारसाठी म्हटलंय... प्रोपोगंडा मशिनरी आणि ट्रोल आर्मी यांच्याविषयी मी बोलतेय' असं म्हणत आपलं म्हणणं मागे घेण्यास ठाम नकार दिला. 

'अशावेळी या विधेयकात ज्या तरतुदी आहेत त्या माझ्यावरही परिणाम करू शकतात' असं म्हणत असतानाच अध्यक्ष बिर्ला यांनी 'हे दहशतवाद्यांवर परिणाम करेल तुमच्यावर नाही' असं म्हटल्यानं संसदेत हास्यकल्लोळ उडाला. 

'राष्ट्रीय चौकशी समितीला (एनआयए) कोणत्याही राज्यात जाऊन पोलीस महासंचालकांना माहिती न देता कुणाचीही संपत्ती जप्त करण्याचा अधिकार या विधेयकात देण्यात आला आहे. हे सहकारी संघवादाच्या भावनेविरुद्ध आहे. पोलीस हा राज्याचा विषय आहे... परंतु, सरकार एनआयएलाच पोलिसांचा अधिकार बहाल करत आहे' असं म्हणत मोइत्रा यांनी हे विधेयक धोकादायक असल्याचं संसदेत म्हटलं. 

परंतु, विरोधकांच्या विरोधानंतरही हे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. यावेळी, 'अर्बन नक्षलवाद वाढवण्यासाठी जे कोणी प्रयत्न करतील. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमचे सरकार त्यांना कोणतीही सहानुभूती दाखविणार नाही' असंही अमित शाह यांनी म्हटलं.