नवी दिल्ली : कारगिल विजयाला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त द्रास-कारगिलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. द्रासमध्ये कार्यक्रमाची सगळी तयारी पूर्ण झालीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दिल्लीहून पाठवण्यात आलेली मशालही द्रासला दाखल होतेय. २६ जुलै १९९९ रोजी भारतानं पाकिस्तानला कारगिलच्या टेकड्यांवरून परास्त करत तिरंगा फडकावला होता.
सकाळी ९.०० वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रासला दाखल होतील. १० वाजता राष्ट्रपती आणि तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुरक्षामंत्री राजनाथ सिंह हेदेखील या कार्यक्रमात सहभागी होतील. तर विजय दिवसाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होतील.
गुरुवारी वायूदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी द्रास-कारगिलला भेट दिली. गेल्या २० वर्षांमध्ये वायूदलामध्ये झालेले बदल आणि आगामी काळात वायूदलामध्ये अपेक्षित असलेल्या सुधारणांना धनोआ यांनी उजाळा दिला.
१९९९ साली कारगिल युद्ध जवळपास ६० दिवसांपर्यंत सुरू होतं. २६ जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. भारतीय सेना आणि पाकिस्तानच्या सेनेत हिमालयाच्या टेकड्यांवरून युद्ध झालं. त्यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांना लढण्यासाठी अनेक कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. पाकिस्तानी घुसखोरांना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या कारवाईत भारताच्या ५२७ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर जवळपास १३६३ जवान जखमी झाले. दुसरीकडे या युद्धात पाकिस्तानचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.