Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरण

तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा खळबळजनक आरोप आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. या दरम्यान आता अमलूकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 21, 2024, 08:26 AM IST
Tirupati Laddu : 'आम्ही तिरुपती मंदिराला तूप कधीच पुरवलं नाही', लाडू वादावर अमूलचं स्पष्टीकरण  title=

देशभरात तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या लाडूचा विषय चर्चेत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपतीच्या लाडूमध्ये तुपाऐवजी जनावरांची चरबीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री नायडू यांनी आधीच्या सरकारवर तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये चरबीचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यामुळे खूप मोठा वाद पेटला आहे. 

या वादात अमूल कंपनीचं नाव पुढे येत होतं. असं म्हटलं जातं होतं की, 'अमूल तिरुमला तिरुपती मंदिराला तूप पुरवत होते.' पण आता या सगळ्या प्रकरणावर अमूल कंपनीचं मोठं विधान समोर आलं आहे. अमूलने सांगितलं की, 'अमूल कंपनीने तिरुपती देवस्थानाला कधीच तूप पुरवठा केला नाही'.

तूप पूर्णपणे तूपापासून तयार केले जाते - अमूल 

अमूलने X वर दिलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे तूप पूर्णपणे दुधाच्या चरबीपासून बनवले जाते आणि एवढंच नव्हे तर सर्व उत्पादनांची अतिशय काटेकोरपणे आणि कठोर अशी तपासणी करतात. अमूल तूप तिरुमला तिरुपती देवस्थानमला (TTD) पुरवले जात असल्याचा उल्लेख सोशल मीडिया पोस्टमध्ये होत आहे. आम्ही हे कळवू इच्छितो की,' आम्ही कधीही TTD ला अमूल तूप पुरवठा केला नाही.'

अमूल पुढे म्हणाले की, 'आम्ही हे देखील स्पष्ट करू इच्छितो की, अमूल तूप आमच्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये दुधापासून बनवले जाते, जे ISO प्रमाणित आहे. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या दुग्धशाळेत मिळणाऱ्या दुधाची गुणवत्ता तपासणी केली जाते ज्यामध्ये FSSAI द्वारे निर्दिष्ट केलेल्या भेसळीचा समावेश आहे.'

काय आहेत आरोप 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आरोप केला होता की, मागील वायएसआरसीपीच्या नेतृत्वाखालील जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात पवित्र प्रसाद लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. ते म्हणाले होते की, गेल्या पाच वर्षांत वायएसआर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी तिरुमलाच्या पावित्र्याला कलंक लावण्याचे काम केले.