नवी दिल्ली : नाल्यात उतरुन सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गंभीर प्रश्न वेळोवेळी समोर आले आहेत. दक्षिण पूर्व दिल्लीतील लाजपतनगरमध्ये अशीच एक दुर्देवी घटना घडली आहे.
याठीकाणी नाल्यात सफाईसाठी उतरलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मीडियातून आलेल्या वृत्तानुसार या तिघांकडे कोणतेही स्वसुरक्षेचे साधन नव्हते. दरम्यान दिल्ली जल बोर्डाने याप्रकरणातून हात वर केले आहेत. आम्ही कोणत्याच कर्मचाऱ्यांना नालेसफाईसाठी सांगितले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याआधी 15 जुलैला दक्षिण दिल्लीतील घिटोरनीमध्ये टॅंक सफाईसाठी उतरलेल्या चार मजदूरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एका पाठोपाठ एक असे तीन कर्मचारी नाल्यात उतरल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पहिल्या उतरलेल्या कर्मचाऱ्याचे काही उत्तर न आल्याने बाकी दोघेही आत उतरले होते. चौथ्या कर्मचाऱ्याला नाल्यातून वाचविण्यात आले आहे.
जोगिंदर, अनू आणि अजय अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे असून तीघेही खिचडीपुर येथे राहणारे आहेत. यातून वाचलेल्या कर्मचाऱ्याचे नाव राजेश आहे. रस्त्याने चाललेल्या एका व्यक्तीने राजेशची हाक ऐकली आणि साधारण १.३० वाजता पोलिसांना फोन केला. याप्रकरणी आयपीसी धारा ३०४, ३०८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे डीसीपी रोमिल बानिया यांनी सांगितले.