...तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईल; केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजरवर संकट

Telecom Department Order : तुमच्या मोबाईल नंबरवर कोणता मेसेज आला आहे का? केंद्राच्या कारवाईनंतर 60 दिवसांमध्ये होणार मोठी कारवाई...  

सायली पाटील | Updated: May 24, 2024, 12:30 PM IST
...तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईल; केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजरवर संकट  title=
Telecom Department Order soon to discontinue 6 lakh 80 thousand numbers for re varification

Telecom Department Order : मागील दशकभरात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रानं केलेली एकंदर प्रगती पाहता या संशोधनं आणि परिस्थितीचा फायदा सर्वसामान्यांनाही मिळाला. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी तुलनेनं अधिक सुकर झाल्या. मोबाईलचा वाढलेला वापर हासुद्धा त्याचाच एक भाग. सध्याच्या घडीला भारतात दर दुसऱ्या व्यक्तीच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. पण, आता मात्र देशातील बहुतांश मोबाईल युजर्स धोक्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनंतर कारवाईच्या दृष्टीनं ही पावलं उचलली जात आहेत. 

देशातील दूरसंचार विभागाकडून सहा लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शनचं रि वेरिफिकेशन करण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं टेलिकॉम विभागानं जवळपास 6 लाख 80 हजार मोबाईल कनेक्शन चुकीच्या पद्धतीनं वापरात असल्याची शक्यता वर्तवली आहे. चुकीची माहिती किंवा कागदपत्र सादर करून हे दूरध्वनी क्रमांक सुरु असल्याची शक्यता या माहितीच्या आधारे वर्तवण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा : घरातील फ्रिज आणि भिंतीमध्ये नेमकं किती अंतर असावं? 

दूरसंचार विभागाच्या या कारवाईअंतर्गत या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना 60 दिवसांआधी सदर दूरध्वनी क्रमांकांसंदर्भात पुन:पडताळणी अर्थात रि वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश दिले आहेत. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, साधारण 6.80 लाख मोबाईल कनेक्शन अवैधरित्या दाखवण्यात आलेली कागदपत्र आणि ओळखपत्रांच्या आधारे सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. येत्या काळात जर कंपन्यांकडून मोबाईल क्रमांकांसंदर्भातील Re verification ची प्रक्रिया तातडीनं करण्यात आली नाही, तर ते क्रमांक बंद केले जातील. 

यापूर्वीही झाली होती अशीच कारवाई... 

दूरसंचार विभागाकडून करण्यात आलेली ही कारवाई पहिल्यांदाच झाली नसून त्याआधी जवळपास 10,834 मोबाईल क्रमांकांसंदर्भात संशय व्यक्त करण्यात आला होता. ज्यानंतर 8272 क्रमांक बंदही करण्यात आले होते.