हैदराबाद : रस्त्यावर, स्टेशनवर, रेल्वेत अगदी मंदिराबाहेर देखील आपल्याला भिकारी अगदी सहज पाहायला मिळतात. मात्र आपले राज्य भिकारी मुक्त करण्यासाठी तेलंगणा सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत भिकारी दाखवल्यास ५०० रुपये बक्षीस मिळणार आहे. ही योजना १ डिसेंबरपासून लागू होणार आहे.
यासाठी ग्रेटर हैदराबाद महापालिका व राज्य सुधारात्मक प्रशासन एकत्रितरीत्या काम करणार आहेत. राज्य भिकारीमुक्त करण्यासाठी बेघर असलेल्या असंख्य भिकाऱ्यांना शासकीय आश्रयस्थानात ठेवण्यात आलं आहे. रस्त्यावर भीक मागणाऱ्यांपैकी १११ पुरुष, ९१ महिला आणि १० चिमुकल्यांना तेलंगणातील आनंद आश्रमात ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांचे फोटो व बोटांचे ठसे देखील घेण्यात आले आहेत. यात पोलिसांनी देखील लक्ष घातल्याने ही योजना यशस्वी होईल, अशी आशा आहे.
भिकाऱ्यांच्या ठिकाणांची माहिती देणाऱ्यांना आम्ही ५०० रुपये बक्षिस म्हणून देणार आहोत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली. हैदराबादेतील बेगिंग अॅक्ट १९७७ अंतर्गत भीक मागताना एखादी व्यक्ती आढळल्यास त्याला सहा महिने ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर, भीक मागणं किंवा लहान मुलांना अथवा अपंग व्यक्तींना भीक मागण्यास भाग पाडणं हा गुन्हा ठरणार आहे. परंतु, भिकाऱ्यांवरील ही बंदी केवळ दोन महिन्यांसाठीच मर्यादित असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त एम. महेंद्र रेड्डी यांनी दिली आहे.