नवी दिल्ली : आयटी कंपनी 'टेक महिंद्रा'नं मंगळवारी भारतीय नौसेनेसोबत ३०० करोड रुपयांचा सुरक्षा करार केला आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असल्याचं सांगण्यात येतंय. या करारानुसार, 'आर्म्ड फोर्सेस सिक्युअर एक्सेस कार्ड' (AFSAC) प्रोजेक्टचा एक भाग म्हणून 'टेक महिंद्रा'कडून नौसेनेच्या सर्व ठिकाणं आणि जहाजांवर 'रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन' (RFID) आधारीत एक्सेस कंट्रोल सिस्टम लागू केलं जाणार आहे. येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो.
'टेक महिंद्रा'नं दिलेल्या माहितीनुसार, नौसेनेचे अधिकारी तसंच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती तसंच माजी कर्मचाऱ्यांकडे सध्या असलेल्या ओळखपत्राची जागा हे नवी AFSAC कार्ड घेतील. यासाठी 'टेक महिंद्रा' ही मुंबई बेस्ड कंपनी आपल्या डाटा सेंटरद्वारे एक्सेस कंट्रोल डिव्हाईस, नेटवर्क डिव्हाईस आणि AFSAC कार्डला हाताळण्यासाठी एक सुरक्षित एप्लिकेशन विकसित करणार आहे.
'राष्ट्रीय सुरक्षा कवच आणखीन मजबूत करण्यासाठी भारतीय नौसेनेसोबत काम करण्यासाठी तत्पर आहे' असं 'टेक महिंद्रा'चे अध्यक्ष (इंडिया बिझनेस) सुजीत बक्षी यांनी म्हटलंय.
'टेक महिंद्रा' कोल इंडिया, इंडिया पोर्टस असोसिएशन, कानपूर स्मार्ट सिटी आणि अशा इतर संस्थांसोबत अगोदरपासूनच कार्यरत आहे.