एका चहावाल्याला केंद्राकडून 'पद्मश्री'ची घोषणा; 'हे' आहे कारण

चहा विकून मिळालेल्या पैशातील मोठा भाग समाजसेवेसाठी दान

Updated: Jan 26, 2019, 04:23 PM IST
एका चहावाल्याला केंद्राकडून 'पद्मश्री'ची घोषणा; 'हे' आहे कारण title=

ओडिशा : प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला देशातील महत्त्वपूर्ण सन्मान पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यात ४ जणांना पद्मविभूषण, १४ जणांना पद्मभूषण आणि ९४ जणांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले गेले. परंतु या सर्वांमध्ये एक अशी व्यक्ती आहे ज्यांच्याबद्दल अनेक कमी लोकांना माहिती आहे. ओडिशातील कटक येथे राहणारे डी. प्रकाश राव गेल्या ६७ वर्षांपासून चहा विकण्याचे काम करत आहेत. परंतु विशेष बाब म्हणजे डी. प्रकाश राव हे चहा विकून मिळालेल्या पैशांतील जवळपास ८० टक्के रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करतात. 

डी. प्रकाश राव यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रभावित होऊन त्यांची भेट घेतली. ३० मे २०१८ रोजी झालेल्या 'मन की बात'मध्ये मोदींनी त्यांच्या कामाची प्रशंसाही केली होती. डी. प्रकाश राव जी मुलं घरातील हालाखीच्या परिस्थितीमुळे शाळेत जाऊ शकत नाही त्या ७०हून अधिक मुलांना शिकवण्याचे काम करतात. 

डी. प्रकाश राव आपल्या कमाईतून मिळालेल्या रकमेतून झोपडपट्टीतील मुलांसाठी मोफत शाळा चालवतात. शाळेनंतर ते रोज रूग्णालयात जातात तिथे ते रूग्णांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सेवा करतात. त्यांना गरम पाणी पुरवण्याचंही ते काम करतात. डी. प्रकाश राव यांचे हे दररोजचे काम आहे. तसेच गरज पडल्यास ते रक्तदानही करतात. कधीही शाळेत न गेलेले राव उत्तम हिंदी आणि इंग्रजी बोलत असल्याने ते मुलांना चांगल्याप्रकारे शिकवू शकतात. त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचे नाव भाराताच्या महान लोकांमध्ये सामिल असून देशातील महत्त्वपूर्ण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले.