ब्रा काढून टेबलावर ठेवा आणि...! पाणावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थिनींनी सांगितला घृणास्पद अनुभव

 या प्रकरणात केरळ पोलिसांनी पाच महिलांना या अटक केलीये. शिवाय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Updated: Jul 20, 2022, 03:13 PM IST
ब्रा काढून टेबलावर ठेवा आणि...! पाणावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थिनींनी सांगितला घृणास्पद अनुभव title=

 मुंबई : रविवारी केरळमध्ये झालेली NEET ची परिक्षा एक वादाचा मुद्दा ठरली. केरळच्या कोल्लममधील एका परिक्षा केंद्रावर गेलेल्या मुलींना अंतवर्स्त्र काढण्यास भाग पाडलं. दरम्यान या लज्जास्पद घटनेनंतर या मुलींना परिक्षा द्यायला लावली. या घटनेचे पडसाद देशभर उमटू लागलेत.

दरम्यान प्रकरणानंतर काही मुलीच्या पालकांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आणि परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्ट एजन्सीने याप्रकरणी ‘फॅक्ट फाइंडिंग टीम’ नेमली आहे. या प्रकरणात केरळ पोलिसांनी पाच महिलांना या अटक केलीये. शिवाय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

दरम्यान घडलेली घटना एका मुलीने एका हिन्दी वेबसाईटला सांगितली आहे. घटना सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने घडलेली घटना सांगितली.

हिन्दी चॅनलशी बोलताना मुलगी म्हणाली, 'फार वाईट आणि घृणास्पद गोष्ट आमच्यासोबत झाली. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर वाटलं की, स्कॅनिंगनंतर मला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र यावेळी तिथल्या एका महिलेने, तू मेटल हूक असलेली ब्रा घातली आहेस का? असं विचारलं. यावर, मी हो म्हणाले.

ती पुढे म्हणाली, नंतर त्यांनी मला एका रांगेत जाण्यास सांगितलं. तिथे दोन रांगा होत्या. त्यातल्या एका रांगेत उभ्या असलेल्या मुलींनी मेटल हूक नसलेल्या ब्रा घातल्या होत्या आणि दुसर्‍या रांगेत मेटल हूक असलेल्या ब्रा घातलेल्या मुली होत्या. रांगेत उभ्या असलेल्या मुलींसोबत काय आणि का होतंय हे मला कळलं. नंतर त्या महिलांनी मला ब्रा काढून टेबलावर ठेवण्यास सांगितलं. 

सर्व ब्रा एकत्र ठेवल्या होत्या. आम्ही परत आल्यावर ब्रा परत मिळेल की नाही हेही आम्हाला माहीत नव्हतं. त्या परत मिळवण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला, असंही त्या मुलीने सांगितलं.

या सर्व प्रकारानंतर मुली खूप रडत होत्या. तिथे उपस्थित महिलेने तुम्ही का रडताय असा, प्रश्न विचारला. "आमच्याकडे स्वतःला झाकण्यासाठी शाल किंवा ओढणीही नव्हती. परीक्षा हॉलमध्ये मुलं आणि मुली दोन्ही होते. सगळ्याच मुलींना खूपच लाजिरवाणं वाटत होतं, हा अनुभव खूप कठीण आणि अस्वस्थ करणारा होता." असं ती म्हणाली.

इतकंच नव्हे तर परीक्षा संपल्यानंतर त्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी विचित्रपणे आम्हाला ब्रा उचलून निघून जा असं म्हटलं. त्यावेळी सर्व मुलींना खूप लाज वाटली. मुलींना ब्रा घालायची होती. त्यावेळी अंधारही पडला होता, पण कपडे बदलण्यासाठी जागाही नव्हती. तो एक भयानक अनुभव होता, असंही त्या मुलीने सांगितलं.