ट्रेकर ते डोळ्यांची डॉक्टर! सुझन मार्टिन यांचा प्रेरणादायी प्रवास...

ती गिर्यारोहणासाठी भारतात आली खरी... पण इथले लोक आता तिला 'डोळ्यांची डॉक्टर' म्हणून ओळखतात... तेही डॉक्टरकीच्या कोणत्याही डिग्रीशिवाय... त्याचं कारणही तसंच आहे... 

Updated: Jan 6, 2018, 12:00 PM IST
ट्रेकर ते डोळ्यांची डॉक्टर! सुझन मार्टिन यांचा प्रेरणादायी प्रवास...  title=

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : ती गिर्यारोहणासाठी भारतात आली खरी... पण इथले लोक आता तिला 'डोळ्यांची डॉक्टर' म्हणून ओळखतात... तेही डॉक्टरकीच्या कोणत्याही डिग्रीशिवाय... त्याचं कारणही तसंच आहे... 

ट्रेकिंगचं पॅशन असलेल्या मूळच्या जर्मनीच्या सुझन मार्टिन या २०११ साली भारतात आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या. लेह-लडाखमध्ये त्यांनी सलग चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक केले. या ट्रेक दरम्यान एका कारागिराला चष्म्याविना काम करताना त्यांनी पाहिलं आणि तिथल्या लोकांची दृष्टी मंदावल्याचं आणि त्यांना चष्म्याची नितांत गरज असल्याचं सुझन यांच्या लक्षात आलं... आणि मग तिथूनचं सुझन यांच्या कार्याला सुरवात झाली.

२०१५ मध्ये लडाखला येताना त्यांनी वेगवेगळ्या नंबरचे चष्मे आपल्या सोबत आणले... आणि लोकांना वाटायला सुरुवात केली. मात्र, येथील नागरिकांच्या डोळ्यांची चाचणी करण्याचा प्रश्न त्यांच्या समोर होता... कारण होतं भाषा... त्यावरही शक्कल लढवत त्यांनी एका पेपरवर काही चिन्ह काढून चाचण्या घेतल्या आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या...
     
५४ वर्षांच्या सुजन आत्ताही वर्षातील तब्बल दोन ते तीन महिने लडाखमध्ये ट्रेक करण्यासाठी घालवतात. ट्रेकच्या बॅगबरोबरच एक चष्म्यांची बॅगही त्यांच्यासोबत तयार असते... त्यामुळे ट्रेंकिग बरोबरच तिथल्या नागरिकांच्या डोळ्याची चाचणी करुन त्यांना चष्मे वाटप करतात... लेह-लडाखमधली भौगोलिक परिस्थिती, भाषेचा अडथळा, आणि वैद्यकीय सेवांची कमतरता या सगळ्याला तोंड देत सुझन गेल्या तीन वर्षांपासून आपलं काम अखंडपणे करत आहेत. आपला मित्रपरिवार आणि स्थानिक गाईड यांच्या मदतीनं गेल्या तीन वर्षात तिथल्या ३०हून अधिक गावांत त्यांनी २५० हून अधिक चष्म्यांचं वाटप केलंय. यावेळी चष्म्याची काळजी कशी घ्यावी तो कसा स्वच्छ ठेवावा हेही लोकांना त्या सांगतात... आणि म्हणूनच कोणतंही प्रमाणपत्र नसताना तिथले  नागरिक सुजन यांना 'आय डॉक्टर' अशी हाक मारतात.
          
भारताच्या प्रेमात पडलेल्या सुजन यांनी २०११ पासून तब्बल १० वेळा लडाख आणि नेपाळमध्ये ट्रेक केले आहेत. मात्र, आता ट्रेकिंगबरोबरच चष्मे वाटण्याचा अभिनव उपक्रमही त्या करतायत. त्यांच्या उपक्रमाला आता जर्मनीतले नागरिकही हातभार लावत आहेत. नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा नव्या उत्साहात सुजन आपल्या भारतील बांधवांना चष्म्याची भेट द्यायला तयार झाल्या आहेत...