नवी दिल्ली : 2016 साली टाटा समूहाच्या अध्यक्ष पदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर मिस्त्री यांनी या निर्णयाला आव्हान दिले होते. डिसेंबर 2019 मध्ये नॅशनल कंपनी लॉ अपिलिएट ट्रिब्युनालने अशा पद्धतीने पदावरून काढण्याच्या निर्णयाला चुकीचे ठरवले. तसेच संबंधित पद मिस्त्री यांना परत देण्यात यावे असा निर्णय दिला होता.
टाटा समूहाने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने नॅशनल कंपनी लॉ अपिलिएट ट्रिब्युनालच्या आदेशाला स्थगिती देत 26 मार्च 2021 रोजी टाटा समूहाच्या बाजूने निर्णय दिला. तसेच, न्यायालयाने टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर मिस्त्री राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.
न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात मिस्त्री यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली. ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सायरस मिस्त्री यांना मोठा झटका दिला.
या निकालानंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून निकालाचे कौतुक केले आहे. 'सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आणि कायम ठेवलेल्या निकालाबद्दल कृतज्ञ असल्याचे म्हणत आजचा निकाल आपल्या न्यायव्यवस्थेची मूल्य प्रणाली आणि नैतिकता मजबूत करते, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.