Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी बंगळुरुमधील मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' (Pakistan) म्हटल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI Chandrachud) यांच्या नेतृत्वात सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अनावश्यक टिप्पणी केल्याचा एक व्हिडीओ समोर आल्यानंतर आज आम्ही येथे एकत्र आलो आहोत असं खंडपीठाने सांगितलं. सरन्यायाधीश म्हणाले की ॲटर्नी जनरल, आम्ही काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे देऊ शकतो. दरम्यान सुप्रीम कोर्टने उच्च न्यायालयाच्या महासचिवांकडून अहवाल मागवला आहे.
सरन्यायाधीशांनी सांगितलं की, आम्ही कर्नाटक हायकोर्टाचे न्यायाधीश वी श्रीशानंद यांच्याकडून सुनावणीदरम्यान करण्यात आलेल्या विधानाची दखल घेतली आहे. आम्ही अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल यांना आमची मदत करण्यास सांगितलं आहे.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलं की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून प्रशासकीय सूचना मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी या न्यायालयाला अहवाल सादर करावा. ही प्रक्रिया 2 आठवड्यांत पूर्ण करावी. सरन्यायाधीशांनी यावेळी न्यायमूर्तींना एकाप्रकारे सल्ला देत सांगितलं की, हे सोशल मीडियाचे युग आहे आणि अशा परिस्थितीत कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवलं जाते, त्यामुळे आपण त्यानुसार काम केलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट सोमवारी याप्रकरणी सुनावणी करणार आहे.
Karnataka High Court judge refers to a locality in Bengaluru as Pakistan, sparks outrage on social media. #KarnatakaHighCourt #Bangalore pic.twitter.com/QOrpDkHWoN
— Bar and Bench (@barandbench) September 19, 2024
कर्नाटक हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान केलेल्या टिप्पणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायमूर्ती वेदव्यासचार श्रीशानंद यांनी पश्चिम बंगळुरुमधील एका मुस्लीमबहुल भागाला 'पाकिस्तान' म्हटलं होतं.
बंगळुरुमधील मुस्लिमबहुल भाग असलेल्या म्हैसूर रोड फ्लायओव्हरच्या दिशेने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती श्रीशानंद म्हणाले होते, 'तुम्ही म्हैसूर रोड फ्लायओव्हरकडे जा. प्रत्येक ऑटोरिक्षात 10 जण असतात. गोरी पल्यापासून म्हैसूर फ्लायओव्हरमार्गे बाजारपेठेकडे जाणारा रस्ता भारतात नसून पाकिस्तानात असल्याने तेथे कायदा लागू होत नाही. हेच खरं आहे. तुम्ही कितीही कडक पोलीस अधिकारी ठेवलात तरी तिथे त्याला मारहाण केली जाते".