Success Story : प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे एक अशी गोष्ट असते, ज्यामुळे त्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी काही तरी वेगळं आणि त्यांच्या फायद्यासाठी करण्याची इच्छा मनात येते. असचं काही झालं आहे हरेकाला हजब्बा यांच्यासोबत. हजब्बा एक फळ विक्रेते आहे. फळ विकत असताना त्यांच्या मनात मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार आला. आपल्या जीवनातील सारे उत्पन्न त्यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्यासाठी शाळा सुरू करण्यासाठी खर्च केली आहे.
आता मुलांसाठी पदवी महाविद्यालय सुरू करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे. हजब्बा एक निरक्षर आहेत. पण आपल्या गावातील मुलांनी शिकावं असं त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी अनेक तडजोडी केल्या. मुलांसाठी शाळा सुरू करण्याच्या विचार हजब्बा यांच्या मनात आला, जेव्हा एक परदेशी जोडपं त्यांच्याकडे फळं विकत घेण्यासाठी आलं होतं.
तेव्हा हजब्बा यांना त्या जोडप्यासोबत संभाषण साधता आला नाही. त्यावेळी हजब्बा यांना वाटलं आपल्याला शिकता आलं नाही पण आपल्या गावातील मुलांनी शिकायला पाहिजे. फळे विकणारे हरेकाला हजब्बा रोज सकाळी संत्र्यांची पेटी लावून व्यवसाय करण्यासाठी 25 किमी प्रवास करतात. गेल्या तीस वर्षांपासून ते मंगलोर येथे जावून तेथून फळे आणून विकण्याचे काम करतात.
सर्वप्रथमन हजब्बा यांनी कॉलनीतील मुलांना शिकवण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरूवातील फक्त दोन मुलांना शाळेत शिकण्यास पाठवले. पण यामध्ये त्यांना समाधान वाटत नव्हते. तेव्हा त्यांनी स्वत:च अशा मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा विचार केला. मात्र ते तितकेसे सोपेही नव्हते. गावांत त्यांची यावरून निंदा नालस्ती खूप झाली.
हजब्बा यांनी लोकांना समजावून मशिदीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एका इमारतीमध्ये त्यांच्या शाळेचं रूपांतर झाले. पण त्यांनी फळे विकणे कधीही सोडलं नाही. त्यांचं हे कार्य लक्षात घेवून 2004 मध्ये नोव्हेंबर महिन्यात दक्षिण कन्नड जिल्हा पंचायतच्या वतीने उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी जमीन देण्यात आली. आता त्यांच्या शाळेत सर्व मुलं आनंदाने शिक्षण घेण्यासाठी येतात.