कोलंबो : अवैधमार्गाने घुसखोरी करून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत ताब्यात घेतलेल्या ८० भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेने सुटका केली आहे. श्रीलंकेच्या नौसेनेने मंगळवारी हा निर्णय घेतला.
द कोलंबो पेजने दिलेल्या वृत्तानुसार, सुटका करण्यात आलेल्या ८० मच्छिमारांपैकी चौघांचे प्राण श्रीलंकेच्या नौसेनेने वाचवले होते. हे चारही मच्छिमार समद्रात मासेमारी करत होते. दरम्यान, समुद्रात गेल्यावर त्यांना पाण्याचा आणि सीमेचा अंदाज आला नाही. अचानक बदललेल्या वातावरणामुळे हे लोक पाण्यात बुडत होते. दरम्यान, श्रीलंकेच्या नौदलाच्या नजरेस हा प्रकार पडल्यावर त्यांनी या मच्छिमारांना वाचवले. मात्र, अवैध मार्गाने सीमा ओलांडने आणि मच्छिमारी केल्याचा आरोपाखाली त्यांना ताब्यात घेतले.
श्रीलंकेच्या नौसेनेने आणि तटरक्षक दलाने श्रीलंकेच्या हद्दीत घुसखोरी करून मासेमारी केल्याबद्धल वेगवेगळ्या वेळी ७६ भारतीय मच्छिमारांना पकडले होते. प्राप्त माहितीनुसार भारतीय मच्छिमारांना कंकेसनथुरई येथून आंतरराष्ट्रीय समुद्री सीमारेषेवर तटरक्षक दलाचे जहाज सागंगमधून भारतात पाठविण्यात आले आहे.