चीरहरण झालेल्या मायावतींनी खुर्चीसाठी सन्मान विकला; भाजप नेत्याकडून शेलक्या शब्दांत टीका

त्यावेळी सपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी गेस्ट हाऊसवर हल्ला केला होता.

Updated: Jan 20, 2019, 07:19 AM IST
चीरहरण झालेल्या मायावतींनी खुर्चीसाठी सन्मान विकला; भाजप नेत्याकडून शेलक्या शब्दांत टीका title=

लखनऊ: उत्तर प्रदेशातील भाजप आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सर्वेसर्वा मायावती यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन टीका केल्याने वादंग निर्माण झाला आहे. चंदौली येथील सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी साधना सिंह यांनी अत्यंत आक्रमकपणे भाषण केले. मात्र, भाषणाच्या ओघात त्यांची जीभ भलतीच घसरली. त्यांनी म्हटले की, मायावती या पुरुष आहेत का महिला हेच समजत नाही. सत्तेसाठी सन्मान विकणारी ही महिला तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट म्हणायला हवी. ज्या महिलेचे चीरहरण होते, ती महिला कधीच सत्तेसाठी पुढे येत नाही. मात्र, मायवती यांनी खुर्चीसाठी हा सारा अपमान गिळला, असे साधना सिंह यांनी म्हटले. यापुढे साधना सिंह यांनी अत्यंत खालच्या पातळीला जाऊन मायावती यांच्यावर टीका केली. 

१९९५ साली उत्तर प्रदेशात घडलेल्या गेस्ट हाऊस कांडच्या अनुषंगाने साधना सिंह यांनी ही टीका केली. उत्तर प्रदेशात १९९५ साली सपा आणि बसपा यांनी युती करून सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी मायावती सरकारमध्ये सहभागी नव्हत्या. कालांतराने दोन्ही पक्षांमधील दुरावा वाढत गेला. तेव्हा मायावती भाजपशी गुप्तपणे संधान साधत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. अशातच २ जून १९९५ रोजी मायावती यांनी लखनऊ येथील गेस्ट हाऊसवर आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी सपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी गेस्ट हाऊसवर हल्ला केला होता. यामध्ये बसपाच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. त्यावेळी मायावती एका खोलीत जाऊन लपल्या होत्या. अखेर भाजप आमदार ब्रह्मदत्त द्विवेदी यांनी गेस्ट हाऊसमधून मायावतींना सहीसलामत बाहेर काढले होते.