सोहराबुद्दीन बनावट चकमक : सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका

या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे गुजरात आणि राजस्थान पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत.

Updated: Dec 21, 2018, 12:41 PM IST
सोहराबुद्दीन बनावट चकमक : सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका title=

नवी दिल्ली - सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणी शुक्रवारी सीबीआयच्या विशेष कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. या प्रकरणी पुराव्यांअभावी कोर्टाने सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका केली. कोर्टाने या प्रकरणात एकूण २१० साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या होत्या. पण त्यापैकी बहुतेक साक्षीदारांनी आपली आधीची साक्ष फिरवल्याने निकालावर परिणाम झाला. या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या कोर्टाचे न्यायाधीश एस. जे. शर्मा या महिनाअखेर निवृत्त होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे गुजरात आणि राजस्थान पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांशी संबंध असल्यावरून सोहराबुद्दीन शेख त्यांची पत्नी आणि सहकारी या सर्वांना २००५ साली गुजरात पोलिसांनी अटक केली होती. २२ आणि २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार २६ नोव्हेंबर २००५ रोजी अहमदाबादजवळ बनावट चकमकीत सोहराबुद्दीन शेखची हत्या करण्यात आली. त्यानंतर तीन दिवसांनी त्याच्या पत्नीलाही मारण्यात आले आणि त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने २७ डिसेंबर २००६ रोजी गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर चापरी येथे तुलसीराम प्रजापतीची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली, असे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणातील २१० साक्षीदारांपैकी ९२ जणांनी आपली साक्ष फिरवली होती. ही घटना १२ वर्षांपूर्वीची असल्याने अनेकांना घटनेचा क्रमही आता लक्षात नाही. या सर्वाचा विचार करून कोर्टाने निकाल दिला असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

कोण होता सोहराबुद्दीन?
सोहराबुद्दीन हा उज्जैनमधील एका छोट्या गावातील रहिवासी होता. सोहराबुद्दीनची आई सरपंच होती तर त्याचे वडील जनसंघाचे कार्यकर्ते होते. मित्र सोहराबु्द्दीनला वकील नावाने बोलवत. तरुणपणातच सोहराबुद्दीन गुन्हेगारी विश्वाकडे ओढला गेला. १९९५ मध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार गुजरात पोलिसांनी व्यापाऱ्यांकडून वसुलीसाठी सोहराबुद्दीनचा वापर केला होता.