हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?

School News : शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांवर विविध संस्कार केले जातात. त्यांना सामाजिक भान जपण्याची शिकवणही इथंच मिळते. पण, याच विद्यार्थ्यांना चुकीची वागणूक मिळाली तर.... 

सायली पाटील | Updated: Sep 6, 2024, 01:01 PM IST
हेच राहिलेलं! बिर्याणी आणली म्हणून तिसरीच्या विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडला हा प्रकार?  title=
shocking UP school terminate 3rd standard student for bringing nonveg tiffin

School News : अमुक एका शाळेत तमुक पद्धतीचं जेवण विद्यार्थ्यांना देण्यास परवानगी नाही, असे नियम हल्ली काही शाळांमध्ये लागू करण्यात आल्याचं बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. अशाच एका घटनेमुळं इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चक्क शाळेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सोशल मीडियावर अनेकांच्या संतापात भर घालणारी ही घटना सध्या अनेक मुद्द्यांवरील चर्चांनाही वाव देत आहे. 

एका सात वर्षांच्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशातील अमरोहा इथं असणाऱ्या एका शाळेमध्ये गुरुवारी डब्यात बिर्याणी आणल्यानं शाळेबाहेर काढण्यात आलं. सोशल मीडियावर यादरम्यानचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला असून, शाळेचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्याच्या आईमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण इथं दिसत आहे. 

जवळपास साडेचार मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये उत्तर प्रदेशातील या शाळेचे मुख्याध्यापक अविनाशकुमार शर्मा वारंवार या विद्यार्थ्यापुढं अपमानास्पक भाषेत बोलत असून, त्यांच्या वक्तव्यामध्ये तो मुस्लीम असल्याचाही उल्लेख झाल्याचं आढळून आलं. 'मोठं झाल्यावर जी मुलं मंदिरं उध्वस्त करतील त्यांना शिकवणार नाही...' असे हे मुख्याध्यापक सतत म्हणताना दिसत आहे. इतक्यावरच न थांबता मुख्याध्यापकांनी नको नको ते आरोप करत ही मंडळी या अशा खाद्यपदार्थांच्या माध्यमातून इतरांचं धर्मांतर करू पाहत आहेत, अशा शब्दांत बतावणी सुरूच ठेवली. 

व्हायरल व्हिडीओतील दृश्यांनुसार मुख्याध्यापकांची ही बडबड सुरू असताना आणि ते गंभीर आरोप करत असताना या मुलाच्या आईनं, त्या चिमुकल्याला ही भाषा कळत नाही, तो तर निर्दोष आहे असं म्हणत आक्रोश करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. मुलाला घेऊन ही महिला घरी परतली, पण आपण नेलेल्या डब्यामुळं जी वागणूक मिळाली, ते मात्र हा मुलगा विसरू शकला नाही. 

हेसुद्धा वाचा : VIDEO: 'रिक्षा तुझ्या बापाची आहे का?', राईड कॅन्सल केल्यानंतर चालकाकडून महिलेचा पाठलाग, भररस्त्यात केली मारहाण

 

संपूर्ण प्रकरणी आता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष घालत त्यासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तपासासातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान अमरोहा मुस्लीम कमिटीनं या संपूर्ण घटनेनंतर गुरुवारी तातडीनं एक बैठक बोलवत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे या मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी करणारं पत्र पाठवलं. सदर प्रकरणी नि:पक्षपातीपणे तपास व्हावा अशी मागणी समितीकडून करण्यात आली.