Girl To Buy Smartphone on Blood: सध्याच्या काळात मोबाईल फोन (Mobile Phone) हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याबरोबरच आता मोबाईल फोनही गरजेची वस्तू बनला आहे. आपली अनेक दैनंदिन कामं आपण मोबाईलच्या माध्यमातून करत असतो. हातात महागडा स्मार्टफोन आजकाल स्टेट्स बनलं आहे. अगदी शाळकरी मुलंही मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. मोबाईल मिळवण्यासाठी मुलं कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार पश्चिम बंगालमध्ये समोर आला आहे.
अल्पवयीन मुलगी पोहोचली ब्लड बँकेत
पश्चिम बंगालमधल्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील ही घटना आहे. एक अल्पवयीन मुलगी बालुघाट इथल्या ब्लड बँकेत पोहोचली. तिथे गेल्यावर तीने आपल्याला रक्त द्यायचं असल्याचं सांगितलं. रक्त घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना संशय आला, त्यांनी त्या मुलीकडे रक्त देण्याचं कारण विचारलं. त्यावर तीने दिलेल्या उत्तराने ब्लड बँकेतले कर्मचारी हैराण झाले.
का द्यायचं होतं रक्त?
या मुलीला स्मार्टफोन विकत घ्यायचा होता, पण तिच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी तिने स्वत:चं रक्त द्यायचा निर्णय घेतला. तीने मोबाईल ऑनलाईन ऑर्डर केला होता, पण तो घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. रक्त दिल्यावर पैसे मिळतात असं कोणीतरी तिला सांगितलं होतं. त्यामुळे आपल्या घरापासून तीस किलोमीटर दूर असलेल्या ब्लड बँकेत ती पोहोचली. ट्यूशला जात असल्याचं तीन घरात सांगितलं. त्यानंतर तीने आपली सायकल बस स्टॅँडवर लावली आणि तिथून बस पकडून ती दुसऱ्या जिल्ह्यातील बालुरघाट इथं पोहोचली.
मिळालेल्या माहितीनुसार त्या अल्पवयीन मुलीचे वडिल भाजी विक्रेते आहेत आणि गृहिणी आहे. दरम्यान, घटनेची माहिती ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांनी मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला दिली. त्यानंतर या मुलीचं समुपदेशन करण्यात आलं आणि तिला आपल्या आई-वडिलांकडे पाठवण्यात आलं.