बंदूक हातात घेऊन शायनिंग मारणं नडलं, ट्रिगर दाबला गेला आणि...

 याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 20, 2022, 06:38 PM IST
बंदूक हातात घेऊन शायनिंग मारणं नडलं, ट्रिगर दाबला गेला आणि...  title=

पंजाब : पंजाबच्या अमृतसरमध्ये एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. बंदुकीचा धाक दाखवत असताना पोलीस कर्मचाऱ्याकडून अचानक गोळी सुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे जवळपासच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मोबाईलच्या दुकानात घडली घटना

अमृतसरमधल्या मोबाईल रिपेरिंग दुकानामध्ये हा पोलीस कर्मचारी आला होता. या पोलीस कर्मचाऱ्याने दुकानात आल्यानंतर त्याची सर्व्हिस रिव्हॉल्वर काढून काऊंटरवर ठेवली होती. यावेळी तो रिव्हॉल्वर दुकानातील लोकांना दाखवत होता. तसंच तो  रिव्हॉल्वर काऊंटरवर फिरवत होता. रिव्हॉल्वर फिरवत त्याने अचानक ट्रिगर दाबला आणि बंदुकीतून गोळी सुटली. 

बंदुकीतून सुटलेली गोळी ही एका दुकानातील कर्मचाऱ्याला लागली. या गोळीबारात कर्मचारी गंभीर जखमी झालाय त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन

या गोळीबार प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं असून कारवाई करण्यात आलीये. अमृतसरचे नॉर्थ विभागाचे एसपी वरिंदर सिंह यांच्या सांगण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई केली जाईल.

पोलीस कर्मचाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ही गोळीबाराची घटना घडली असल्याची माहिती आहे. यात एक व्यक्ती जखमी झालाय. दरम्यान सध्या या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या माहितीवरुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे.