नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या पाच दिवसांपासून 45 जवान मारले गेले. या प्रकरणावरुन राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केली आहे. पुलवामामध्ये नदीचे पाट पाहिले याचा बदला जर एखादे सर्जिकल स्ट्राईक घेऊन करणार असाल तर याला बदला म्हणता येणार नाही असे शिवसेनेचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे. तसेच काश्मीर प्रश्नाचे राजकारण देशात करायचे, पण कश्मीरात उद्ध्वस्त झालेल्या गुलाबावर पाय ठेवून पुढे जायचे हे आता तरी थांबावे. हा मुद्दा पटवून देताना शिवसेनेने माजी पंतप्रधान इंदीरा गांधी यांचे गुणगान गायले आहे. या सर्वात विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना आणि भाजपा यांची युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह हे आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर सामनातून भाजपावर होणारी टीका सुरूच असल्याने या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
पाकव्याप्त कश्मीर हा भारताचा भाग असून त्यातील चौक्यांवर हल्ले करणे म्हणजे पाकड्यांना धडा शिकवणे नव्हे असा टोला शिवसेनेने लगावला आहे. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांचे उदाहरण देत म्हटले, पाकिस्तानला धडा शिकवला तो इंदिरा गांधी यांनीच. लाहोरपर्यंत फौजा घुसवून त्यांनी पाकचा तुकडाच पाडला. लाखावर सैन्याला गुडघे टेकायला लावले. पुलवामानंतर पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानवर कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य सैन्याला दिले. 'वेळ, दिवस आणि स्थान सैन्याने ठरवायचे व बदला घ्यायचा' अशी मुभा मोदी यांनी सैन्यप्रमुखांना दिली. पुन्हा सर्जिकल स्ट्राइक अथवा मर्यादित युद्ध यातील पर्यायाचा वापर करावा असे म्हटले आहे. कश्मीरातील परिस्थिती नेमकी काय आहे व युद्ध हाच एकमेव पर्याय आहे काय? असा प्रश्न विचारत पाकिस्तानबरोबरच्या युद्धास विरोध करणारे बगलबच्चे आपल्याच देशात असल्याचे वास्तव सामनातून समोर आणण्यात आले आहे.
'कश्मीरातील जवानांच्या हत्येचा बदला घ्यायचा असेल तर पुन्हा भाजपला मते द्या, कमळासमोरचे बटण दाबा' असा प्रचार सुरू करणे म्हणजे 40 मृत जवानांच्या मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे, असा टोला देखील शिवसेनेने लगावला आहे.
कश्मीरातील तरुण शिक्षण, रोजगार, प्रतिष्ठा यापासून ‘दूर’ जात आहे आणि तोच तरुण नाइलाजाने उपजीविका म्हणून स्वतःच्याच देशाविरुद्ध शस्त्र हाती घेत आहे. यावर काम करण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्वांचा फायदा पाकिस्तानने घेतला. कश्मीरातील तरुणांना, मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाला अफझल गुरू, बुरहाण वाणीसारखे लोक स्वातंत्र्यसैनिक व जवळचे वाटतात, तितके आमचे पंतप्रधान मोदी का वाटत नाहीत? असा प्रश्न अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा कश्मीरवासीयांना आपले वाटतील तेव्हा शांततेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेलेले असेल असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.