धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा? उद्या निर्णय होणार?

दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात चिन्हासाठी लढाई

रामराजे शिंदे | Updated: Oct 6, 2022, 02:49 PM IST
धनुष्यबाण ठाकरेंचा की शिंदेंचा? उद्या निर्णय होणार? title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) आरोप-प्रत्यारोपांनतर आता ठाकरे आणि शिंदे गटातली महत्त्वाची लढाई सुरु होणार आहे. शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं ठाकरे गटाचं की शिंदे गटाचं याबाबत लवकरच फैसला होण्याची शक्यता आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) जाहीर झालीय, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू होतेय. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे. 

पण धनुष्य बाण कोणाचा याचा निर्णय उद्याही होण्याची शक्यता नाहीए.  शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार या संदर्भात उद्या 7 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) कागदपत्रं सादर करणार आहे. एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य सोबत असल्याचं सांगत आहे.

शिंदे गटाने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्या सोबत असल्याचं सांगत आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळावं असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. निवडणूक आयोगाने आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितलं आहे. 

एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलीपी द्याव्यात असे आदेश दिले. पण शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कागदपत्र मिळाली नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 

अजूनही दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे. तर शिंदे गटानेही चिन्हाव दावा ठोकला आहे.