नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत (CAB) शिवसेनेकडून राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेत दिले. राऊत यांनी म्हटले की, लोकसभेत जे झालं ते विसरून जा. आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकात काही सुधारणा सुचवल्या होत्या. याबद्दल आम्ही राज्यसभेत प्रश्न उपस्थित करू, असे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत वेगळी भूमिका घेणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
बाहेरची ओझी छाताडावर घेऊ नका; शिवसेनेचा मोदी-शहांना इशारा
तब्बल १२ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी हे विधेयक लोकसभेत ३११ मतांनी मंजूर झाले. विधेयकाच्या विरोधात ८० मते पडली. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. मात्र, लोकसभेप्रमाणे राज्यसभेत भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपला इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने आपली भूमिका बदलल्यास भाजपची मोठी अडचण होऊ शकते.
कालच संजय राऊत यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काही सवाल विचारले होते. आमचा नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध नाही. घुसखोरांना बाहेरच हाकलून दिले पाहिजे. स्थलांतरित हिंदुंना नागरिकत्व देणे, हेदेखील अगदी योग्य आहे. मात्र, त्यामुळे भाजप व्होटबँक तयार करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. हा आरोप फोल ठरवण्यासाठी स्थलांतरितांना पुढील २५ वर्षे मतदानाचा हक्क देऊ नये, असे राऊत यांनी म्हटले होते.