सीआरपीएफ जवानानं सहकाऱ्यांवर झाडली गोळी, दोघांचा मृत्यू

दोन जवान मद्य प्राशन करत असताना त्यांचा मेस इन्चार्जसोबत वाद झाला

Updated: Dec 10, 2019, 12:43 PM IST
सीआरपीएफ जवानानं सहकाऱ्यांवर झाडली गोळी, दोघांचा मृत्यू  title=

रांची : झारखंडमध्ये निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आलेल्या एका सीआरपीएफ जवानानं आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केलाय. २६ बी बटालियनचा सहाय्यक कमांडंट साहुल हसन आणि ए एस आय पी भुइयां यांचा या गोळीबारात मृत्यू झालाय तर इतर तीन जवान गंभीर जखमी झालेत. गंभीर जखमी झालेल्या दोन जवानांना रात्री उशिरा हेलिकॉप्टरनं रांचीला हलवण्यात आलं. 

गोळीबार करणारा जवान १२६ एडोब बटालियनमध्ये तैनात आहे, अशी माहिती एडीजी ऑपरेशन एम एल मीणा यांनी दिलीय. या जवानानं आपला कंपनी कमांडर एस आय जुम्मे सिंह याच्यावर गोळ्या झाडल्या. याच दरम्यान त्याला पकण्यासाठी गेलेल्या आणखी एक जवान गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर जवानानं पहिल्यांदा मेस इन्चार्जवर आणि नंतर आपल्या कमांडरवर गोळीबार केला.

संतरी ड्युटीवर असणाऱ्या एका जवानालाही छर्रा लागल्यानं गंभीर दुखापत झालीय. त्याच्यावर रांचीत उपचार सुरू आहेत. याशिवाय ज्या जवानानं गोळ्या झाडल्या त्याच्या गुडघ्याला दुखापत झालीय. 

काही दिवसांपूर्वी अशीच घटना छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये घडली होती. इथंही सुरक्षादलाच्या एका जवानानं आपल्याच सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत सहा जवानांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. हे जवान आयटीबीपीमध्ये कार्यरत होते.