मुंबई : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानं कुंभकर्ण जागा झाल्याचा टोला आज सामनाच्या अग्रलेखात मारण्यात आलाय. पंतप्रधान मोदींनी काल एका जाहीर सभेत राममंदिराला होणारा विलंब काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे होत असल्याचा आरोप केलाय. त्यावर आधारीत सामनाच्य़ा अग्रलेखात मोदींच्या भाषणावर जहरी टीका करण्यात आलीय. राममंदिरास काँग्रेसचा, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा अडथळा होता म्हणून तर लोकांनी त्यांना सत्तेतून बेदखल केले आणि भाजपची सत्ता आणली. त्यामुळे आता काँग्रेसवर खापर फोडणे थांबवा असा टोलाही सेनेनं आपल्या मुखपत्रातून लगावलायं.
मंदिर बांधण्यासाठी जी हिंमत लागते ती नसल्याने लोकांनी काँग्रेसला धूळ चारली व हिंमतबाज छप्पन इंचवाल्यांच्या हाती कारभाराच्या किल्ल्या सोपवल्या तरीही त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, काँग्रेस दिसत असेल तर तुमच्या छातीचे मोजमाप जनतेला पुन्हा घ्यावे लागेल, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
एकीकडे अयोध्येमध्ये शिवसेनेची हवा असताना रामलल्लाचं दर्शन घेतल्याचं समाधान उद्धव ठाकरेंबरोबर आलेल्या शिवसैनिकांना मिळालं आहे. आपल्या अयोध्या दौऱ्यातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षामध्ये चैतन्य निर्माण करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आहेत. दुसरीकडे आपला निवडणुकीतला हुकुमी एक्का पळवून नेण्याची भीती भाजपाच्या मनात उत्पन्न झाली आहे. त्याच वेळी रामाचं नाव घेत मतांचं पुन्हा एकदा ध्रुवीकरण करण्याचाही ठाकरेंचा प्रयत्न आहे.