रामराजे शिंदे, झी मीडिया, ग्वाल्हेर : देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असतानाच राममंदिराचा मुद्दा तापलाय. पण रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा वाद गेलेल्या कित्येक निवडणुकांमध्ये या ना त्या कारणानं वारंवार पुढे येत असतो. त्याचा परिणाम मात्र गेल्या काही वर्षात हळूहळू कमी होत गेलाय. मध्यप्रदेशातल्या जनतेवर सध्या तापलेल्या वातावरणाचा परिणाम झालाय का? मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक मतदान दोन दिवसांवर आली असतानाच अयोध्येत राम मंदिर मुद्द्याने जोर पकडला आहे. परंतु राम मंदिर मुद्दा मध्य प्रदेश निवडणूकीत कितपत महत्त्वाचा ठरेल हे पाहणं ही तितकंच महत्त्वाच आहे.
मोहन भागवत यांनी दिल्लीत संघाच्या दोन दिवसांच्या शिबिरात राम मंदिर बांधण्याचे वक्तव्य केले. आता उद्धव ठाकरे यांनीही कुंभकर्णाची झोप घेणा-या सरकारला उठवायला आलोय असं म्हटलंय.
अगोदर सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर मुद्द्यांवरून संघाचा अजेंडा स्पष्ट केला तर आता शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन राम मंदिर उभारण्यासाठी गर्जना केली.
सरकारवर संघ, शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचा दबाव वाढत चालला आहे. याचा परिणाम निवडणूक दिसून येत नाही.
'मंदिर वही बनाऐंगे' च्या घोषणा आता काम करताना दिसत नाहीत. राम मंदिर मुद्द्यांचं राजकारण केलं जात असल्याने सरकारवरचा विश्वास कमी होताना दिसतोय असं म्हटलं जातंय.
उत्तर प्रदेशात आणि केंद्रात भाजप सरकार आहे. परंतू तरीही राम मंदिर बांधता आले नाही. यापुढे भाजपची वाटचाल कशी असेल यावरही जनतेनं संशय व्यक्त केलाय.
राम मंदिर उभारण्यावरून अयोध्येत वातावरण तापले असले तरी त्याचा परिणाम मध्य प्रदेशात दिसत नाही.
मंदिर नव्हे तर विकासालाच जनतेने प्राधान्य दिलंय. राम मंदीराचा मुद्दा मागे पडून विकासाचा मुद्दा पुढे आलाय.
हा विकासाचा मुद्दा भाजपला तारेल का ? राम मंदिर मुद्दा सोडणे परवडेल का ? हे निवडूकांनंतरच्या निकालातूनच स्पष्ट होईल.