'....त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन,' मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवराज सिंग चौहानांनी स्पष्ट सांगितलं, झाले भावूक

शिवराज सिंग चौहान यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ अखेर संपला आहे. भाजपाने मोहन यादव यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, शिवराज सिंग चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना मांडल्या आहेत.   

शिवराज यादव | Updated: Dec 12, 2023, 03:23 PM IST
'....त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन,' मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवराज सिंग चौहानांनी स्पष्ट सांगितलं, झाले भावूक title=

मध्य प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शिवराज सिंग चौहान यांना निवडणुकीतील विजयानंतर तुम्ही दिल्लीत जाणार नाही असं का म्हणाला होतात? अशी विचारणा केली. यावर शिवराज सिंग चौहान यांनी काही मागण्याआधी मी मरणं पसंत करेन असं उत्तर दिलं. 

3 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीत भाजपाचा बहुमताने विजय झाल्यानंतर मध्य प्रदेशातील अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता शिवराज सिंग चौहान यांनी दिल्लीला न जाण्याबद्दल सांगितलं होतं. याचसंबंधीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा शिवराज सिंग म्हणाले की, "एक गोष्ट मी फार नम्रपणे सांगतो की, स्वत:साठी काही मागण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. यासाठीच मी दिल्लीला जाणार नाही असं म्हणालो होतो". 

पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं की, "मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार अपूर्ण कामं पूर्ण करणार आहे आणि प्रगतीच्या बाबतीत राज्याला नव्या उंचीवर नेतील. मी नेहमीच मोहन यादव यांना सहकार्य करेन. आज माझ्या मनात आनंदाची भावना आहे. 2003 मध्ये उमाजींच्या नेतृत्वात भाजपा सरकार आलं होतं. नंतर मीच त्या सरकारचं नेतृत्व केलं होतं. 2008 मध्ये आम्ही पुन्हा सत्तेत आलो. 2013 मध्ये पुन्हा भाजपाचं बहुमताचं सरकार आलं. 2018 तही भाजपाला जास्त मतं मिळाली. पण जागांच्या गणितात आम्ही मागे पडलो. पण तरीही आम्ही सरकार स्थापन केलं. आज जेव्हा मी येथून निरोप घेत असताना मनात सुखाची भावना आहे की आजही भाजपाचंच सरकार आलं आहे".

"मला या गोष्टीचाही आनंद आहे की, आम्हाला सत्ता मिळाली तेव्हा मध्य प्रदेश फार मागासलेला होता. पण आम्ही इतक्या मोठ्या प्रवासात त्याला विकास आणि प्रगतीच्या मार्गावर आणलं. या वर्षांमध्ये मी सर्व क्षमता आणि सामर्थ्य झोकून देत विकासासाठी काम केलं. मी फार प्रामाणिकपणे राज्यासाठी काम केलं. याचमुळे खड्ड्यांचा मध्य प्रदेश आता शानदार हायवे असणारं राज्य झालं आहे. आम्ही मध्य प्रदेशला अंधारातून काढत जगासमोर नवं राज्य आणलं. टपरीवरील आयटीआयपासून आम्ही ग्लोबल स्किल पार्कपर्यंत पोहोचलो आहोत," असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. 

पुढे ते म्हणाले की, "मुख्यमंत्री असताना माझं नातं जनतेसोबत कुटुंबाप्रमाणे होते. मामाचं नातं प्रेम आणि विश्वासाचं असतं. प्रेम आणि विश्वासाचं हे नातं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल".